ऑस्कर फर्नांडिस यांच्या निधनाने काँग्रेसने उत्तम संघटक गमावला
: पुणे शहर काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली
पुणे: माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांच्या निधनाने एक निष्ठावान नेता आणि उत्तम संघटक पक्षाने गमावला आहे, अशा शब्दात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आयोजिलेल्या सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे मेंगलोर येथे सोमवारी निधन झाले. या ज्येष्ठ नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेशजी बागवे यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभा घेण्यात आली. या सभेला माजी आमदार उल्हासदादा पवार, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहनदादा जोशी, प्रदेश सरचिटणीस अभयजी छाजेड, नगरसेवक अविनाश बागवे तसेच रमेश अय्यर, राजेंद्र शिरसाट, विठ्ठल गायकवाड, प्रविण करपे, राहुल तायडे, शिलार रतनगिरी, गौरव बोराडे, गणेश शेडगे, सुनील पंडित आदी पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाच्या संघटनेचा दांडगा अभ्यास ऑस्कर फर्नांडिस यांचा होता. पक्षाने सोपविलेल्या संघटनात्मक सर्व जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. ती कामगिरीही त्यांनी चोखपणे बजावली. फर्नांडिस यांच्या निधनाने पक्षाने उत्तम संघटक गमावला आहे, असे मा.उल्हासदादा पवार यांनी श्रद्धांजली सभेत बोलताना सांगितले. माझे आणि त्यांचे वैयक्तिक संबंध होते. त्यांच्या निधनाने माझीही वैयक्तिक हानी झाली आहे. असे पवार म्हणाले.
काँग्रेस पक्षाचे ऑस्कर फर्नांडिस हे अनुभवी, जाणकार नेते होते. पक्षाच्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणारा, गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेला नेता आपल्यातून गेला आहे. गेल्या वर्षभरात काँग्रेसचे अहमदभाई पटेल, राजीवजी सातव असे नेते गेले. त्या दु:खातून सावरत असतानाच ऑस्कर फर्नांडिस यांच्या निधनाची बातमी समजली. जुन्या पिढीतील नेत्याचे निधन झाल्याने संघटनेला पोकळी जाणवत राहील, अशा शब्दात रमेश बागवे यांनी भावना व्यक्त केल्या.
युवक काँग्रेसपासून ऑस्कर फर्नांडिस काम करीत होते. कर्नाटकातील मेंगलोर येथून ते लोकसभेवर निवडून गेले होते. राज्यसभेचेही ते काही काळ सदस्य होते. पक्षातील विविध आघाड्यांची जबाबदारी ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होती आणि त्यांनी या आघाड्यांना मजबूत केले. नि:स्वार्थीपणे काम करणारा नेता काँग्रेसने गमावला. त्यांच्याशी माझा अनेक वर्षांचा परिचय होता. त्यांच्या निधनाने मलाही त्यांची उणीव भासत राहील, अशा शब्दात मोहन जोशी यांनी श्रद्धांजली वाहिली.
COMMENTS