जागतिक योग दिनानिमित्त लेख | बदलती जीवनशैली आणि योग
आज आपली जीवनशैली खऱ्याप्रकारे आरोग्याच्या आधारावर योग्य आहे का ? आजचा आपला आहार , विहाराबाबत खरेतर नव्याने विचार करायची तसेच यामध्ये बदल करायची आवश्यकता निर्माण झालीये. आजच्या संगणकीय युगात तरुणांची जीवनशैली पाश्चात्य देशांप्रमाणे होवू लागली आहे. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे विविध आजार उद्भवतात. बिघडल्यामुळे जीवनशैली पूर्वी पन्नाशीनंतर होणारे रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, पचनाच्या तक्रारी, ताणतणाव असे आजार तरुण वयात होतांना दिसून येत आहेत. ‘जीवनशैली’मुळे उद्भवणारे आजार हे डॉक्टरांसहित सगळ्यासाठीच एक आव्हान आहे.
व्यायामाचा अभाव, अनियमित आहार, मानसिक ताणतणाव, व्यसनाधीनता ,जंक फूड खाण्याचे प्रमाण, भ्रमणध्वनीचा अतिरिक्त वापर, रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशीरा उठणे, बदलते नाते संबंध, कामाच्या ठिकाणी असलेले ताणतणाव , अभ्यासाचा वाढणारा अतिरिक्त ताण आणि ह्या सगळ्यामुळे होणारे शारीरिक आणि मानसिक आजार शरीराबरोबर मनावरही तेवढेच खोल परिणाम करतात. ह्या सगळ्यावर आपल्या भारतीय संस्कृतीत योग हे एक उत्तम शास्त्र आहे . योगामुळे शरीर, मनाची क्रिया उत्तम प्रकारे कार्य करते. त्यामुळे योग आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग करुन घेणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी दररोज योगा करुन आपले आरोग्य स्वास्थ ठेवावे.
योग म्हणजे ‘युज’ ह्या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ आहे जोडणे. इथे आत्मा आणि मन हे जोडणे असा अर्थ अभिप्रेत आहे. भारतीय योग जीवनशैली, शारीरिक आणि मानसिक त्रास दूर करुन शरीराला नवीन उर्जेचा संप्रेषण करते.
शारिरीक विकासासाठी योग
वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन, उत्तम आरोग्य, यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योगा समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतू प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो. योगाचे सखोल परिणाम आपल्या सूक्ष्म स्तरावर सुद्धा होत असतात.
आसनातून आरोग्याचे संवर्धन
आसनांचा नियमित अभ्यास केल्याने शरीर निरोगी राहते. रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते. अग्नी प्रदीप्त राहतो. भूक लागते, मलाचे अनुलोमन नीट होते. मनाची एकाग्रता वाढते. मास स्नायू व मज्जारज्जू या सर्वांचे कार्य सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथींचे कार्य सुधारते. आसनांमुळे आरोग्याचे संवर्धन होते. शरीरातील सर्व अवयव व मन हे एकत्रितपणे समन्वयाने काम करतात. त्यामुळे मनावरील व शरीरातील ताणतणाव कमी होते. आसनांमुळे शरीरातील विकृतीचे निराकरण होवून त्यांचे कार्यात सुधारणा होते परिणामी शरीर उत्तम स्थितीत राहते. मानसिक विकृती जसे काम क्रोध, मत्सर, द्वेष, लोभ, अहंकार यांवर नियंत्रण प्राप्त होते. आसनांमध्ये संधी आणि स्नायू यांना ताण बसतो त्यामुळे तेथील रक्तपुरवठा सुधारतो. त्या स्नायूंचे कार्य सुधारते.
आनंदी मनासाठी योग
सूर्य नमस्कार, कपाल भाती आणि प्राणायाम या योगिक्रियांनी वजन कमी होते. अनुलोम विलोम, भरम्री या सारख्या प्राणायामा मुळे ताणतणावापासून मुक्ती मिळते. रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणाऱ्या ताण तणावांचा निचरा योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणामुळे होतो. योगाच्या सरावाने शरीरातली विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर टाकली जातात. योगा आणि ध्यानधारणेमुळे मन सतत आनंदी, प्रसन्न आणि शांत राहते. त्याचा उपयोग आपल्या जवळच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित होवून नाते संबंधात सुधारणा होते .
शरीरशुद्धीसाठी प्राणायाम
प्राणायाम हा शब्द प्राण आणि आयाम यापासून बनला आहे. प्राणही उर्जा शरीरातील सर्व अवयवांना पुरवला जाते व त्याबरोबरच शरीरातील महत्त्वाची श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्था याचे नियमन केले जाते. नियमन यामध्ये प्रयत्नपूर्वक श्वासावर नियंत्रण केले जाते कारण प्राणाद्वारे विश्वासाचे महत्त्वपूर्ण नियमन होते. प्राणायाम ही एक अशी क्रिया आहे ज्यामध्ये प्राणाचे नियमन हे श्वासाद्वारे प्रयत्नपूर्वक केले जाते प्राणायामामुळे विविध प्रकारच्या नाडीची शुद्धी होते. प्राणायाम सर्व प्रकारच्या शरीरातील विषजन्य घटकांची शुद्धी होते. अलीकडे मनोकायीक आजार (सायको सिमॅटिक) आजार नियंत्रित करण्यासाठी प्राणायामाचा फायदा होतो. प्राणायामाचे महत्त्वाचे उद्दिष्ट मनावर नियंत्रण करणे असे आहे. जेव्हा मन नि:श्चल होते त्यावेळी कोणत्याही विचारांची प्रक्रिया किंवा भावनिक अडथळे निर्माण करू शकत नाही म्हणून मनावर नियंत्रण ठेवल्यामुळे आपण विविध प्रकारच्या भावनांवर विजय मिळवू शकतो.
आसने करतांना घ्यावयाची काळजी
सकाळी लवकर उठून प्रातविधी उरकून रिकाम्या पोटी आसने करावीत. आसने नेहमी प्रसन्न मोकळे आणि नैसर्गिक वातावरणात करावे.चटई किंवा आसन घेवूनच आसने करावीत. सुती आणि सैलसर कपडे वापरावे शक्यता मौन पाळावे. गर्भवती आणि रोगी अवस्थेत योग्य योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय आसने करु नयेत. आसनांच्या वेळी श्वासोश्वास नॉर्मल असावा. थकवा येईपर्यंत आसने करू नयेत. आसने केल्यानंतर किमान अर्धा ते एक तासाने आंघोळ करावी. शक्यतो रिकाम्यापोटी आसने करावी. संध्याकाळी आसने करण्यापूर्वी जेवणानंतर तीन-चार तासानंतर करावेत. शरीरात कंप आल्यास आसन सोडून द्यावे. बळजबरीने आसने करू नयेत आसना नंतर शवासन जरूर करावे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदरुस्त ठेवू शकतो. मनावर चांगले संस्कार करुन त्यावर ताबा ठेवता येतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम योगाच्या माध्यमातून होतो. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवरील विविध देशांनी स्वीकारुन त्याचा प्रचार आणि प्रसारही केला आहे. संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असतांना योगामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत झाली. त्यामुळे योगाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.