महिला आरक्षण | काहींची गणिते जुळली तर काहींना करावे लागणार पक्षांतर!
पुणे – महिला आरक्षणाची सोडत निघाल्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीचे चित्र मंगळवारी जवळपास स्पष्ट झाले. या आरक्षणामुळे प्रस्थापित मधील काही नगरसेवकांचा मार्ग सुकर झाला आहे. तर काहींची मात्र गणिते पूर्णपणे बिघडून गेली आहेत. सोडतीत अनेक नेत्यांच्या प्रभागात महिला आरक्षण पडल्याने त्यांना नवीन प्रभागाचा अथवा घरातील महिलेला रिंगणात उतरावे लागणार असल्याचे समोर आले आहे. तर काही प्रभागांमध्ये पक्षातील इच्छुकांबरोबरच उमेदवारी मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. तर अनेकांना महापालिकेच्या सभागृहात जाण्याच्या इच्छेवर पाणी सोडावे लागणार आहे. अनेक इच्छुकांना पक्षांतराशिवाय पर्याय राहिलेला नाही.
स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्षपद मिळवून इतिहास घडविणाऱ्या हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे हे इच्छुक असलेले प्रभाग क्रमांक १७ मध्ये दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे या दोघांसह राजेश येनपुरे, दिलीप काळोखे, कृणाला टिळक, युवा मोर्चाचे बापू मानकर, प्रमोद कोंढरे यांच्या अनेक यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तर प्रभाग क्रमांक २० मधील दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्याने तेथे देखील उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. माजी महापौर रजनी त्रिभुवन, लता राजगुरू यांना उमेदवारीसाठी झगडावे लागेल. प्रभाग क्रमांक १० मध्ये देखील दोन्ही जागा महिलांसाठी राखीव झाल्याने आजी-माजीसह नगरसेवकांच्या इच्छेवर पाणी फिरले आहे.
बाळासाहेब बोडके, आदित्य माळवे, राजू पवार, चंद्रकांत अमराळे यांच्या अनेकांना आजूबाजूच्या प्रभागाचा आसरा घ्यावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक २१ मध्ये बंडू गायकवाड आणि उमेदवार गायकवाड समोरासमोर येण्याची शक्यता अधिक असल्याचे सध्या चित्र आहे. या प्रभागात भाजपकडून इच्छुक असलेल्यांची संख्या मोठी असल्याने कोणाच्या गाळात माळ पडणार हा औसुक्याचा विषय राहणार आहे. तर प्रभाग १६ फग्युर्सन कॉलेज-एरंडवणे या प्रभागात मात्र उलटी परिस्थती आहे. महिलासाठी राखीव असलेल्या माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, निलीमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे या प्रमुख महिलांसह इच्छुकांची संख्या मोठी आहे. प्रभाग २९ घोरपेड पेठ-महात्मा फुले मंडई या प्रभागात दोन महिलांसाठी राखीव जागा आहेत. त्यामुळे अजय खेडेकर, सम्राट थोरात, अजय दरेकर, विजय ढेरे. नाराजय चव्हाण, विष्णू हरिहर, आयुब पठाण, मुनाफ शेख यांच्यासह अनेक इच्छुकांना प्रभाग २८ महात्मा फुले स्मारक-भवानी पेठ या ठिकाणी उमेदवारीसाठी प्रयत्न करावा लागणार आहे. तर प्रभाग क्रमांक ३२ भुसारी कॉलनी-बावधन खुर्द येथे दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्याने बंडू केमसे, दिलीप वेडेपाटील यांच्यासारख्या अनेक दिग्गज एकमेकांसमोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रभाग क्रमांक ३४ वारजे कोंढवे धावडे एक महिलेसाठी राखीव प्रभाग झाल्याने महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.मात्र, याच प्रभागात सचिन दोडके, किरण बारटक्के, भारतभूषण बराटे, सचिन दांगट, शुक्राचार्य वांजळे यांच्या दिग्गजांमध्ये लाढाई होण्याची शक्यता आहे. या प्रभागाला लागून असलेल्या ३५ रामनगर-उत्तमनगर दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने दिलीप बराटे यांच्या प्रश्न मार्गी लागला असल्याची चर्चा आहे. तर प्रभाग क्रमांक ३६ कर्वेनगर प्रभागात एक जागा सर्वसाधारण गटासाठी आल्याने सुशिल मेंगडे, जयंत भावे, राजाभाऊ बराटे, स्वप्नील दुधाणे यांच्यासह अनेकांना उमेदवारी मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. तर सनसिटी-नांदेड सिटी या प्रभाग क्रमांक ५२ अनुकूल असलेल्या प्रभागात दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्याने मंजूषा नागपुरे, राजश्री नवले, यांचे प्रश्न सुटला आहे. तर प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप यांच्यासह इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता अधिक आहे.
खडकवासला-नऱ्हे प्रभाग ५३ या नव्याने आलेल्या सर्वसाधारण गटाची उमेदवारी मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमालीची सुरस होण्याची शक्यता आहे.कात्रज परिसरातील प्रभाग क्रमांक ४९ बालाजीनगर-शंकर महाराज मठ या प्रभागात माजी महापौर दत्ता धनकवडे आणि राजेंद्र शिळीमकर एकमेकांसमोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर ५६ चैतन्य नगर भारती विद्यापीठ प्रभागात दोन महिलांसाठी जागा राखीव झाल्याने वर्षा तापकीर या प्रभागातून रिंगणात उतरण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. तर राष्टवीदीचे विशाल तांबे, युवराज बेलदरे यांच्या पक्षांतर्गत चुरस निर्माण झाले आहे. प्रभाग रचना आणि आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्याने अनेक प्रभागातील लढतीचे सर्वसाधारण चित्र समोर आले आहे.
COMMENTS