मनपा कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात कोण ठरतेय अडसर?
: सांख्यिकी आणि लेखा विभागात समन्वयाचा अभाव
पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांना(PMC emploees) सातवा वेतन आयोग(7th pay commission) लागू झाला आहे. त्यानुसार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नोव्हेंबर पासून सुधारित वेतन देखील मिळू लागले आहे. मात्र 1 जानेवारी 2021 ते 31 ऑक्टोबर पर्यंतची फरकाची रक्कम अजूनही मिळालेली नाही. याबाबत कर्मचारी वर्गातून ओरड सुरु आहे. याबाबत स्थायी समिती(Standing committee) देखील सकारात्मक आहे. मात्र सांख्यिकी व संगणक विभाग आणि लेखा विभाग या दोघांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. दोन्ही विभाग एकमेकांवर बोट दाखवत आहेत. मात्र यामुळे कर्मचाऱ्यांना रखडत बसण्याची वेळ आली आहे.
: कर्मचारी संघटनेने केली आहे मागणी
पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी/ कर्मचारी यांना शासन आदेशानुसार ७ वा वेतन आयोग मंजूर करण्यात आला असून सुधारीत वेतनश्रेणी नुसार माहे नोव्हेंबर २०२१ चे वेतन प्रत्यक्ष आदा करण्यात आलेले आहे. ७ व्या वेतन आयोगानुसार प्रत्यक्ष वेतन दिनांक ०१.०१.२०२१ पासून देणेबाबत नमूद आहे. त्यानुसार मनपा अधिकारी/ कर्मचारी यांना दि.०१.०१.२०२१ ते ३१.१०.२०२१ या कालावधीतील वेतनातील फरकाच्या थकबाकीची रक्कम रोखीने त्वरित आदा होणे आवश्यक आहे. तसेच दि.०१.०१.२०१६ ते ३१.१२.२०२० पर्यंतच्या वेतनाच्या फरकाच्या थकबाकीची रक्कम कार्यरत अधिकारी/ कर्मचारी यांना चालू आर्थिक वर्षापासून ५ समान हप्त्यात तसेच सेवानिवृत्त सेवकांना दोन वर्षाच्या कालावधीत आदा करणेबाबत नमूद करणेत आले आहे. तरी, दि.०१.०१.२०२१ ते ३१.१०.२०२१ या कालावधीतील वेतनातील फरकाच्या थकबाकीची रक्कम रोखीने माहे जानेवारी २०२२ अखेर व दि.०१.०१.२०१६ ते ३१.१२.२०२० पर्यंतच्या वेतनातील फरकाच्या धकबाकी रकमेपोटीचा १ला हप्ता दिनांक ३१ मार्च 2022 अखेर मिळावा. अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.
: दोन्ही विभागांचे एकमेकांकडे बोट
दरम्यान हा फरक देण्याबाबत नुकतीच स्थायी समिती मध्ये देखील सकारात्मक चर्चा झाली होती. त्यानुसार सांख्यिकी व संगणक विभाग आणि लेखा विभागाने हे काम तात्काळ करावे, असे सांगण्यात आले होते. याबाबत मुख्य लेखा अधिकारी व वित्त अधिकारी उल्का कळसकर(Ulka Kalaskar) यांना विचारले असता, त्यांनी सांगितले कि सांख्यिकी विभागाला आम्ही याबाबत दोनदा माहिती मागितली आहे. नुकतेच एक लेखी पत्र देखील दिले आहे. मात्र त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित माहिती मिळालेली नाही. फरकाबाबतची पूर्ण माहिती असल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या माहितीची आम्ही वाट पाहतो आहोत. दरम्यान याबाबत सांख्यिकी व संगणक विभागाचे अधिकारी राहूल जगताप(Rahul Jagtap) यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले कि मागील आठवड्यात आम्ही लेखा विभागाला त्यांना अपेक्षित सर्व माहिती दिली आहे. याबाबत स्थायी समितीत देखील चर्चा झाली होती. लेखा विभागाला अजून माहिती हवी असल्यास ती ही तात्काळ दिली जाई; मात्र आमच्याकडून माहिती गेली आहे. असे ही जगताप म्हणाले.
COMMENTS