महापालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसचे परिपत्रक (circular) कधी निघणार?
| दिवाळी खरेदीसाठी कर्मचाऱ्यांची ऐनवेळेला धावपळ होणार
पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीच्या मुहूर्तावर सानुग्रह अनुदान अर्थात बोनस देण्यात येतो. त्याचप्रमाणे बक्षिसी दिली जाते. मात्र यंदा दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. असे असले तरीही महापालिका प्रशासनाकडून बोनस बाबतचे परिपत्रक जारी करण्यात आलेले नाही. शिवाय कर्मचाऱ्यांना अजूनही उचल रक्कम (Advance) दिलेला नाही. वेतन झाले मात्र ते घराचे आणि विम्याचे हफ्ते भरण्यात संपून गेले. अशातच दिवाळीची खरेदी कशी आणि कधी करायची, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा आहे. कारण बोनस किंवा उचल मिळाली नसल्याने येत्या शनिवारी, रविवारी खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे हे दोन्ही जेंव्हा मिळेल तेव्हा खरेदी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ होणार, हे नक्की.
महापालिका कर्मचारी आणि अधिकारी यांच्या बोनस बाबतचा करार मागील वर्षी संपला होता. त्यानुसार महानगरपलिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सेवक (रोजंदारी कामगारांसह) तसेच माध्यमिक व तात्रिक शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर सेवकांना (शिक्षण सेवकांसह) आणि पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाकडील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना (बालवाडी शिक्षिका व सेवकांसह) तसेच महानगरपालिकेच्या कामास नेमण्यात आलेल्या कंत्राटी व एकवट वेतनावर काम करणाऱ्या सेवकांना, ज्यांचे वेतन महानगरपालिका निधीतुन अदा करण्यात येते त्या सर्वांना सन २०२०-२१ ते सन २०२४-२५ या पाच आर्थिक वर्षातील सुधारित वेतन संरचनामधील मूळ वेतन + ग्रेड पे + महागाई भत्ता या एकुण रकमेच्या ८.३३ टक्के अधिक जादा रकम प्रत्येक वर्षी अनुक्रमे १७,०००, १९,०००, २१,०००, २३,०००, २५,००० इतकी एकुण रकम सानुग्रह अनुदानापोटी दिवाळीपुर्वी दोन आठवडे मान्यताप्राप्त युनियन बरोबर करार करून देण्यात यावी. अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली होती. त्यानुसार याला मंजुरी देण्यात आली होती. मागील वर्षी 8.33% अनुदान आणि पहिल्या वर्षी 17 हजाराची ज्यादा रक्कम देण्यात आली होती. ही ज्यादा रक्कम प्रति वर्षी 2 हजार रुपयाने वाढवण्यात येते. शिवाय मगील वर्षी सर्व कर्मचाऱ्यांना 3 हजाराचा कोविड प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात आला होता.
यंदा मात्र दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली तरीही बोनस चे परिपत्रक नाही. किमान १५ दिवस अगोदर तरी परिपत्रक येणे अपेक्षित असते. तसेच उचल रक्कम ही देण्यात आलेली नाही. वेतन झाले मात्र ते घराचे आणि विम्याचे हफ्ते भरण्यात संपून गेले. अशातच दिवाळीची खरेदी कशी आणि कधी करायची, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा आहे. कारण बोनस किंवा उचल मिळाली नसल्याने येत्या शनिवारी, रविवारी खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे हे दोन्ही जेंव्हा मिळेल तेव्हा खरेदी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ होणार, हे नक्की. त्यामुळे बोनस आणि उचल रक्कम लवकर दिली जावी. अशी मागणी कर्मचारी करत आहेत.