नवनियुक्त सहायक अतिक्रमण निरीक्षकांना प्रशिक्षण अनिवार्य
| अन्यथा शिस्तभंगाची कारवाई
पुणे | महापालिका प्रशासनाकडून नुकतीच भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये 97 सहायक अतिक्रमण निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाचे कामकाज गतिमान करण्यासाठी या निरीक्षकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जे लोक प्रशिक्षणाला येणार नाहीत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिला आहे.
पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी सक्षम प्रशासन व सक्षम कार्यप्रणाली निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेतील नवनियुक्त सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक संवर्गातील कर्मचा-यांना त्यांच्या कामकाजासंबंधित विविध विषयांचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पुणे म.न.पा प्रशिक्षण प्रबोधिनी मार्फत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक संवर्गातील कर्मचा-यांना प्रशिक्षण पुणे महापालिकेतील श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (Old G.B. hall) येथे आयोजित करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या आदेशानुसार
१. प्रशिक्षणाकरीता निवडलेले सेवक यांचेकरीता सदर ३ दिवसीय प्रशिक्षण सक्तीचे आहे.
२. संबंधित सर्व प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षणाचे ठिकाणी प्रशिक्षण वेळेच्या १५ मिनिटे आगोदर उपस्थित रहावयाचे आहे. उशीरा येणा-या प्रशिक्षणार्थींना प्रवेश दिला जाणार नाही.
3. सर्व प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षणास पूर्ण दिवस प्रशिक्षणास उपस्थित रहावे.
४.संबंधित खातेप्रमुख यांनी वरील प्रशिक्षणार्थी सेवकांना प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहण्यासाठी ०८ ते १०मार्च २०२३ या दोन दिवसांसाठी कार्यमुक्त करावे.
५. जे सेवक प्रशिक्षणास उपस्थित रहाणार नाहीत त्यांना गैरहजर समजून पुढील शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.