रस्त्याचे आयुर्मान वाढवण्यासाठी महापालिका करणार पर्यावरण पूरक रस्ते!
| प्रस्ताव अंतिम टप्प्यात
पुणे | रस्ते आणि रस्त्यावरील खड्ड्यावरून महापालिका प्रशासनाला नेहमीच टीकेला तोंड द्यावे लागते. सद्यस्थितीत देखील महापालिका पुणेकरांच्या रोषाचा सामना करत आहे. यावर आता महापालिकेनेच उपाय शोधला आहे. शहरातील रस्ते चांगले असावेत तसेच त्यांचे आयुर्मान वाढावे यासाठी महापालिका पर्यावरणपूरक रस्ते तयार करणार आहे. विशेष म्हणजे यात पथविभागासहित महापालिकेच्या सर्व विभागाचा समावेश असणार आहे. याबाबतचा प्रशासनाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. महापालिका आयुक्तांची याला मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ यावर अंमल केला जाणार आहे. अशी माहिती महापालिका पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली. दरम्यान अशा पद्धतीचे रस्ते तयार करणारी पुणे मनपा राज्यात पहिली मनपा असणार आहे.
महापालिकेकडून रस्त्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पावसाळी पूर्व कामे करून पुन्हा पावसाळा संपल्यानंतर रस्त्यांची डागडुजी केली जाते. मात्र शहरातील जंगली महाराज रस्ता वगळता सगळ्याच रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य दिसून येते. खासकरून पावसाळ्यात महापालिकेला याबाबत खूप टीकेचा सामना करावा लागतो. सद्यस्थितीत महापालिका पुणेकरांच्या रोषाचा सामना करत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पथ विभाग आणि त्यांचे वाहतूक नियोजनकार यांनी एक नामी उपाय शोधून काढला आहे. त्यानुसार आगामी काळात शहरात पर्यावरण पूरक रस्ते तयार केले जाणार आहेत.
अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे आणि वाहतूक नियोजनकार निखिल मिजार यांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यावरण पूरक रस्त्याच्या माध्यमातून महापालिका रस्त्याचे आयुर्मान वाढवणार आहे. यामध्ये वेगवेगळे उपाय केले जाणार आहेत. त्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरण्यासाठी rainwater recharge spit केले जातील. तसेच बोअर घेतले जातील. ज्यातून पाणी रस्त्यावर न राहता बाजूला मुरेल. रस्ते तयार करताना त्यात बांधकामातील राडारोडा वापरला जाईल. यामुळे रस्ते तयार करताना माती आणि खडी टाकण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच जे वेस्टेज राहील त्याचा देखील पुनर्वापर करता येणार आहे.
महापालिकेच्या वतीने आता रस्त्याच्या कडेला व मध्यभागी झाडे लावली आहेत मात्र ज्यादा पाण्यामुळे ही झाडे अशक्त झाली आहेत. मात्र पर्यावरण पूरक रस्ते करताना रस्त्याच्या कडेला आणि मध्यभागी देशी प्रकारची झाडे लावली जाणार आहेत. Treeguard या संकल्पनेच्या माध्यमातून झाडांना पाणी मिळेल. ज्याला छिद्र असतील, त्यातून पाणी जाऊन झाडांच्या मुळाना मिळेल. त्याने झाडे चांगली वाढतील. तसेच झाडांना पाणी देण्यासाठी ड्रीप इरिगेशन चा वापर करण्यात येईल. ज्यामुळे पाण्याचा जास्त होणारा वापर देखील रोखला जाईल.
Waste plastic या संकल्पनेच्या माध्यमातून रस्ते तयार करताना त्यामध्ये waste प्लास्टिक चा वापर केला जाईल. प्लास्टिक चे श्रेड तयार करून ते डांबरात मिसळण्यात येतील. त्यामुळे डांबराची लाईफ वाढते. साहजिकच यामुळे देखील रस्त्याचे आयुर्मान वाढण्यास मदत होणार आहे.
पार्किंग च्या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी पोरस पेविंग ब्लॉक वापरले जातील. हा प्रयोग महापालिकेनं तळजाई टेकडीवर केला आहे. यातून पाणी फिल्टर होते. यामुळे पाणी जमिनीत जिरेल. ज्यातून पाणी वाचवले जाणार आहे.
याच योजनेच्या माध्यमातून सगळ्या रस्त्यावर सौर उर्जेवर चालणारे दिवे बसवले जातील. त्याचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न महापालिका करेल.
महापालिकेकडून रस्त्यावर विविध हेतूंसाठी पेंट केले जाते. मात्र यात असणाऱ्या विविध कंपोनंट मुळे रस्त्याला हानीपोहोचते. हे टाळण्यासाठी महापालिका इको फ्रेंडली पेंट वापरणार आहे. ज्यामुळे रस्त्यांना हानी पोहोचणार नाही.
यासाठी वेगळे काही न करता महापालिका आहे त्याच कामात याचा अंतर्भाव करणार आहे. यामुळे फक्त 10% खर्च वाढू शकतो. मात्र यामुळे रस्त्याचे आयुर्मान वाढून पुणेकरांना चांगले रस्ते मिळतील. विशेष म्हणजे यामध्ये महापालिकेच्या सगळ्या विभागाना सहभागी करून घेतले जाणार आहे.
—-
महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्या आदेशानुसर आम्ही ही योजना राबवत आहोत. पर्यावरणपूरक रस्त्यांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. लवकरच हा प्रस्ताव महापालिका आयुक्तांसमोर ठेवला जाईल. आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर तात्काळ यावर अंमलबजावणी केली जाईल.
– साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग.
—-
पर्यावरण पूरक रस्ते केल्याने रस्त्याचे आयुर्मान वाढेल. पर्यावरण रक्षण ही महापालिकेची जबाबदारी आहे. या माध्यमातून हे काम होईल. तसेच राडारोडा, वेस्टेज जाणाऱ्या गोष्टीचे नियोजन करता येईल, त्याचा पुनर्वापर करता येईल. यासाठी महापालिकेला तज्ञ् लोक देखील सहायता करणार आहेत. अशा पद्धतीचे रस्ते करणारी पुणे महापालिका पहिलीच असेल. त्या निमित्ताने इतर शहरांना ते एक रोल मॉडेल ठरेल.
– निखिल मिजार, वाहतूक नियोजनकार.
—