कोथरूड मधील वाहतूक कोंडी सुटणार!
| सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिर विकास आराखडा मंजूर
| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार
कोथरुड मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिर रोडला मंजुरी मिळाली आहे. यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यामुळे हा रस्ता लवकरच तयार होऊन कोथरूडकरांची वाहतूककोंडीच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. (Kothrud Traffic)
कोथरूड मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून, त्यासाठी विविध पर्याय महापालिकेच्या माध्यमातून समोर आले होते. त्यातील सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिर रोड मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी सातत्याने होत होती. मात्र, सदर रस्त्याच्या कामात अनेक अडथळे होते. या मार्गावरील बहुतांश जागा ही किर्लोस्कर कमिन्सच्या मालकीची असल्याने, जमीन अधिग्रहणाचा मोठा प्रश्न होता. (Guardian Minister Chandrakant Patil)
हा प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष प्रयत्न सुरू होते.अखेर या प्रयत्नांना यश आले असून, सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिरच्या विकास आराखड्यास मंजूरी मिळाली आहे. सदर रस्ता किर्लोस्कर कमिन्सच्या मदतीने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरण होऊन २० मीटर होणार आहे. त्यासाठी १५ कोटी खर्च अपेक्षित आहे. जुलै २०२३ पर्यंत सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे बांधकाम विभागाचे नियोजन आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.