तुमचं आणि माझं जे नातं आहे, ते फक्त फोटोपुरतं मर्यादित नाही
: राज ठाकरे यांनी बोलून दाखविली खंत
पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिक, औरंगाबादच्या दौऱ्यानंतर ते पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात राज ठाकरेंनी बुधवारी मुक्काम केल्यानंतर गुरुवारी पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. पक्षातील पदाधिकारी आणि शाखा अध्यक्षांच्या बैठका राज ठाकरे यांनी घेतल्या आहेत. तसेच आताच्या दौऱ्यात राज ठाकरे कामाचा आढावा घेत आहेत.
पुण्यात राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी एक खंत बोलावून दाखवली. पूर्वी खरंच बरं होतं. जेव्हा मला लोक भेटायचे, तेव्हा तिथले विषय सांगायचे, घरच्या काही गोष्टी सांगायचे. मात्र आता जे मला भेटतात ते फक्त फोटो काढतात आणि निघून जातात. तुमचं आणि माझं जे नातं आहे, ते फक्त फोटोपुरतं मर्यादित नाही, असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना म्हटलं.
दरम्यान, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे यांनी पुण्यावर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. त्यामुळेच ते मतदारसंघानुसार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. यात ते आगामी निवडणुकीची रणनीती ठरवतानाच उमेदवारांचीही चाचपणी करत असल्याचं बोललं जात आहे. राज ठाकरे स्वतः मैदानात उतरल्याने सध्या मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील चांगलाच उत्साह पाहायला मिळत आहे.
पुण्यात राज ठाकरेंनी चिमुकल्याचं केलं नामकरण-
राज ठाकरे यांना पुणे दौऱ्यावर असताना एक वेगळाच अनुभव आला आहे. त्यांचे चाहते राज ठाकरे यांच्याकडे कोणती मागणी करतील याचा काही नेम नाही, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. परभणीचे जिल्ह्यातील एका जोडप्याने राज ठाकरेंकडे त्यांच्या चार महिन्यांच्या चिमुरड्याचे नाव ठेवण्याची मागणी केली. केसरीवाड्यातील बैठक संपल्यावर या दाम्पत्याने राज ठाकरे यांना गाठून चिमुरड्याला नाव देण्याची विनंती केली. या मागणीने राजही काही क्षण बुचकळ्यात पडले होते. पण नंतर मुलाच्या आईचा आग्रह पाहता राज यांनी चिमुरड्याला ‘यश’ हे नाव दिलं.
COMMENTS