महापालिकेच्या पथ विभागाच्या कामाचा दर्जा झाला उघड | पुन्हा झाली रस्त्यांची चाळण
| विभागप्रमुख म्हणतात काम सुरु आहे लवकरच रिपोर्ट देऊ
पावसाळापूर्व रस्ते दुरुस्ती आणि पावसाळय़ात पडलेले खड्डे दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने आत्तापर्यंत तब्बल करोडो रुपयांचा खर्च केला आहे. कोटय़वधी रुपये खर्च करूनही पावसाने रस्त्यांची चाळण झाल्याने हा खर्च पाण्यात गेल्याने उधळपट्टीच ठरला आहे. दरम्यान, रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेच्या पथ विभागाने याआधी केलेल्या कामाचा दर्जा उघड झाला आहे. आता नव्याने कामे सुरु केली आहेत. याबाबत विभाग प्रमुख वी जी कुलकर्णी यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि दुरुस्तीची कामे सुरु केली आहेत, याचा लवकरच रिपोर्ट देऊ.
यंदाच्या पावसाळय़ात शहर आणि उपनगरातील रस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली असल्याचे चित्र पुढे आले. वर्षभर सतत सुरू असलेल्या रस्ते खोदाईमुळे रस्त्यावर खड्डे पडल्यानंतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांना गैरसोईला सामोरे जावे लागले.
समान पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण आणि पथ विभागाने एकाच कामांसाठी वारंवार केलेल्या खोदाईमुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याची वस्तुस्थिती आहे. जुलै महिन्यातील पहिल्याच जोरदार पावसाने अनेक रस्त्यांची चाळण झाल्याचे पुढे आले. वर्षभरापासून सुरू असलेली कामे रखडल्याने पावसाळय़ातील जुलै महिन्यात भरपावसात शहराच्या विविध भागांत रस्ते खोदाई आणि रस्त्यांची कामे सुरू राहिली. त्यामुळे महापालिकेला रस्ते दुरुस्ती करण्यास पुरेसा वेळच मिळाला नाही. त्यातच पावसातच महापालिकेच्या पथ विभागाकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात आली. पावसाळापूर्वी कामे करताना रस्ते पूर्ववत करण्यासाठी चार कोटी, तर पावसाळय़ात रस्त्यांची दुरवस्था झाल्यानंतर ते दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने चार कोटी, असा एकूण आठ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. त्याशिवाय क्षेत्रीय कार्यालयाकडून स्वतंत्र खर्च करण्यात आला आहे. त्यानंतरही रस्त्यांची चाळण झाल्याने वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला. मात्र ही कामेही तकलादू असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर शहर आणि उपनगरात रस्ते पूर्ववत केलेल्या कामांची पोलखोल झाली. अनेक रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले असून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची दुरवस्था, खड्डय़ांबाबत महापालिकेच्या तक्रार निवारण केंद्राकडे शेकडो तक्रारी येत असतानाही महापालिकेने ९८ टक्के खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे, हे विशेष. दरम्यान, रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेच्या पथ विभागाने याआधी केलेल्या कामाचा दर्जा उघड झाला आहे. आता नव्याने कामे सुरु केली आहेत. याबाबत विभाग प्रमुख वी जी कुलकर्णी यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि दुरुस्तीची कामे सुरु केली आहेत, याचा लवकरच रिपोर्ट देऊ.