सुनिल टिंगरे यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला
| भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचा टोला
वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी पुणे महापालिका प्रशासनाच्या विरोधात केलेले लाक्षणिक उपोषण म्हणजे त्यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला असेच म्हणावे लागेल. असा टोला भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी लगावला.
मुळीक म्हणाले, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या माध्यमातून विविध विकास कामे आणि प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत. पुणे मेट्रोचे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे. भामा आसखेड पाणी प्रकल्पामुळे या भागातील पाणीपुरवठ्याची समस्या बहुतांश सुटली आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे कामही 70 टक्के पेक्षा अधिक झालेले आहे. वडगाव शेरी च्या विविध भागात पीपीपी तत्त्वावर रस्ते निर्मितीची कामे सुरू आहेत. नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी गोल्फ चौकात उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून खराडी ते शिरूर उड्डाणपूल निर्मितीच्या कामाला वेग आलेला आहे. पुणे विमानतळाचे विस्तारीकरण आणि पार्किंग ची सुविधा उपलब्ध होत आहे. मी आमदार असताना प्रस्तावित केलेले लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालय आता अंतिम टप्प्यात आहे. खराडीत पंतप्रधान आवास योजनेचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर टिंगरे यांची निष्क्रियता आणि अकार्यक्षमता मतदारांसमोर आली आहे या भीतीतून त्यांनी लाक्षणिक उपोषणाची स्टंटबाजी केली आहे.
मुळीक पुढे म्हणाले, राज्यात तीन वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. त्या काळात राज्य शासनाच्या माध्यमातून टिंगरे यांना वडगाव शेरी तील मोठ्या प्रकल्पांसाठी शून्य भोपळा निधी मिळाला. आपले अपयश लपविण्यासाठी टिंगरे हे सातत्याने भाजपने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या किंवा सुरू करीत असलेल्या प्रकल्पाबाबत पत्रव्यवहार करतात आणि त्या कामाचे श्रेय घेण्यासाठी पुढे येतात. वडगाव शेरीच्या गेल्या काही वर्षातील विकासात टिंगरे यांचे शून्य योगदान आहे. हे अपयश लपविण्यासाठी ते स्टंटबाजी करतात हे जनतेला माहिती असून त्याचे योग्य उत्तर मतपेटीद्वारे मिळेल.
नगर रस्त्यासाठी वाहतूक आराखडा भाजपने केला
केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सन 2019 मध्ये पुणे शहरातील 200 किलोमीटर रस्त्यांचे रोड सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते. त्यात पुणे नगर रस्ता हा वाहतुकीसाठी सर्वात धोकादायक असल्याची बाब समोर आली होती याचा विचार करून स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पुणे नगर रस्ता हे एक एकक मानून नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा तयार केला. त्यामध्ये मेट्रो मार्गाचे नियोजन, ठीकठिकाणी उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग अशा उपायोजना करून महापालिकेच्या सन 2019-20 च्या अंदाजपत्रकात सुचविल्या होत्या. त्यासाठी निधीची तरतूद केली होती. त्यापैकी गोल्फ चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. खराडी, कल्याणी नगर ते कोरेगाव पार्क उड्डाणपुलाचे विस्तारीकरण, येरवडा, शास्त्री नगर येथे उड्डाणपूल, विश्रांतवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत उड्डाणपूल सुचविण्यात आले होते. विश्रांतवाडी येथील पुलाच्या कामासाठी तज्ञ सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. त्याचे पूर्व गणन पत्रक तयार करण्यात येत आहे. म्हणजे नजीकच्या काळात ही सर्व विकासकामे सुरू होणार आहेत. त्याचे श्रेय घेण्यासाठी सुनील टिंगरे स्टंटबाजी करत आहेत.
यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे माजी नगरसेवक योगेश मुळीक,संतोष खांदवे,अर्जुन जगताप,,राजू बाफना,विजय चौगुले आदी उपस्थित होते