महापालिका अधिकाऱ्यांच्या हातातून अतिरिक्त आयुक्त पद निसटले!
| भारतीय रेल्वे सेवेतील विकास ढाकणे यांची अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती
पुणे | महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner ) विलास कानडे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या पदावर महापालिकेचा अधिकारी पदोन्नतीच्या माध्यमातून येणार असे बोलले जात होते. यासाठी 5 ते 6 नावे चर्चेत होती. त्यासाठी चांगलीच रस्सीखेच सुरु होती. मात्र महापालिका अधिकाऱ्यांच्या (PMC Officers) हातातून हे पद निसटले आहे. कारण राज्य सरकारने या पदावर भारतीय रेल्वे सेवेतील (IRPFS) विकास ढाकणे (Vikas Dhakane) यांची या पदावर प्रतिनियुक्ती ने नियुक्ती केली आहे. यामुळे महापालिका अधिकाऱ्यांच्या महत्वाकांक्षेवर पाणी फेरले आहे. (Pune municipal corporation Additional commissioner)
राज्य सरकारने महापालिकेत एक अतिरिक्त आयुक्त पद हे महापालिका अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवले आहे. त्याबाबतचा निर्णय देखील घेण्यात आला होता. त्यानुसार पहिले अतिरिक्त आयुक्त होण्याचा मान सुरेश जगताप यांना मिळाला होता. त्यानंतर ज्ञानेश्वर मोळक, विलास कानडे यांना संधी मिळाली होती. कानडे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यानुसार महापालिका अधिनियम, सेवानियमावली आणि सेवा ज्येष्ठतेनुसार हे पद नियुक्त केले जाणार होते. यासाठी बरेच जण पात्र ठरत आहेत. त्यानुसार राज्य सरकारला महापालिकेकडून 5 ते ६ लोकांच्या नावांची यादी पाठवायची होती. सामान्य प्रशासन विभागाकडून हा प्रस्ताव आयुक्ताकडे पाठवला होता. मात्र आयुक्त कार्यालयातून हा प्रस्ताव राज्य सरकार पर्यंत पोचला नव्हता.
सामान्य प्रशासन विभागाने तयार केलेल्या यादीनुसार यामध्ये नगर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर, मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला, पीएमआरडीए कडे प्रतिनियुक्ती वर गेलेले विवेक खरवडकर तसेच विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांची नावे अंतिम केली होती. यावर महापालिका आयुक्तच निर्णय घेणार होते.
नगर अभियंता या पदासाठी पहिल्यापासूनच इच्छुक नाहीत. त्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार उल्का कळसकर पात्र होत होत्या. एक महिला अधिकारी अतिरिक्त आयुक्त झाली तर पुण्यासाठी ते महत्वाचे मानले जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. त्याखालोखाल दौंडकर, बोनाला आणि खरवडकर यांची नावे येतात. त्यामुळे कळसकर या पदासाठी जोरदार प्रयत्न करत होत्या. मात्र दुसरीकडे महापालिका अधिनियम कलम 45 मधील तरतुदीनुसार काही नावे यातून अपात्र होऊ शकतात. त्यामुळे इथे तांत्रिक विभागाकडून विद्युत विभागाचे श्रीनिवास कंदूल देखील जोरदार फिल्डिंग लावून होते.
तर इकडे महापालिका आयुक्तांच्या मनात दुसरेच काहीतरी घोळते होते. महापालिका आयुक्तांना असे वाटत होते कि काही काळासाठी या पदावर महापालिकेचा अधिकारी देण्यापेक्षा सरकारचाच अधिकारी द्यावा. मात्र नियमानुसार तसे करता येत नव्हते. तरीही आयुक्तांची ही मनीषा कशी फलद्रुप होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार होते. त्यानुसार आता भारतीय रेल्वे सेवेतील विकास ढाकणे यांची अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.