केंद्रातील मोदी सरकारने देशामध्ये अघोषित आणीबाणी लागू केली आहे | अरविंद शिंदे
केंद्र सरकारच्या अखतारित असलेल्या आयकर खात्याने काल BBC या आंतरराष्ट्रीय वृत्त समुहाच्या दिल्ली व मुंबई येथील कार्यालयांवर छापे टाकून तेथील कामगारांना बंदीस्त करून कारवाई केली याच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवी पेठ पत्रकार भवन येथे तोंडाला काळीफित बांधून शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीपद्धतीने काम करत असून देशात लोकशाही व्यवस्था, संविधान सर्व काही धाब्यावर बसवले आहे. मोदी व शहांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई करुन तो आवाज दडपण्याचे काम केले जाते. BBC च्या दिल्ली व मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचे छापे हे त्याचाच भाग आहे. BBC ने गुजरात दंगलीसंदर्भात दोन आठवड्यापूर्वी एक डॉक्युमेंटरी प्रसारित केली होती, त्याचा राग धरूनच ही छापेमारी केली असून हा योगायोग नसून देशात अघोषीत आणीबाणी अल्याचेच हे द्योतक आहे, BBC ने तयार केलेली डॉक्युमेंटरी भारतात दाखवू नये यासाठी मोदी सरकारने तात्काळ त्यावर बंदी घातली. बंदी घातली असतानाही काही ठिकाणी ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. बीबीसीच्या या डॉक्युमेंटरीमुळेच मोदी सरकारचे पित्त खवळले व त्यांच्या आवडत्या अस्त्रातील आयकर विभागाचे छापे टाकून बीबीसीला गप्प करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारच्या विरोधात बोलल्यास त्याच्यावर ईडी, सीबीआय अथवा आयकर विभागाच्या माध्यमातून कारवाई करून गप्प करण्याचा प्रयत्न केला जातो. याचा निषेध म्हणून आज आम्ही पत्रकारांच्या संरक्षणासाठी व लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाच्या स्वातंत्र्यासाठी हे मूक आंदोलन करीत आहोत.’’
यावेळी प्रदेश पदाधिकारी ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, संगीता तिवारी, सोनाली मारणे, रजनी त्रिभुवन ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, रफिक शेख, सुधीर काळे, भरत सुराणा, मारूती माने, सचिन भोसले, आनंद गांजवे, भगवान कडू, प्रकाश पवार, राजेंद्र नखाते, शिवाजी भोईटे, सुनिल पंडित, भोला वांजळे, राजू नाणेकर आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.