पुणे मेट्रोचा संपूर्ण पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होण्याचा पालकमंत्र्यांना विश्वास
| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे मेट्रो प्रकल्पाला भेट दिली. प्रारंभी शिवाजीनगर येथील भूमिगत मेट्रो स्थानकाची पाहणी केली. नंतर गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक येथे पाहणी करुन तिकीट घेत वनाज स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला.
यावेळी आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते.
पाहणीप्रसंगी श्री. पाटील म्हणाले, शहराची वाढती गरज पाहता आपण रस्ते, उड्डाणपूल आदी प्रकल्प करत आहोत. परंतु, मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर शहरातील गर्दी मेट्रोमध्ये स्थलांतरीत होईल. पुणे मेट्रोचे काम गतीने सुरू असून ३३ कि.मी.चा पूर्ण एक टप्पा मार्च २०२३ पर्यंत महामेट्रोकडून पूर्ण करण्यात येईल.
पुढच्या तीन टप्प्यांनाही गती देण्यात येईल. त्यातील २ टप्प्यांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेले असून त्याचा स्वत: पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले. तसेच तिसऱ्या टप्प्यातील ८५ कि.मी. लांबीच्या मेट्रोचा प्रकल्प अहवाल महानगरपालिका करत आहे. त्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत खूप मोठा सकारात्मक बदल होईल, असेही ते म्हणाले.
प्रवासी वाहतूक गतीने होण्याचे उद्दिष्ट असतानाच प्रत्येक स्टेशन वेगवेगळ्या संकल्पनेनुसार डिझाईन करण्यात आले असल्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणातही भर पडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानकाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्र्यांसमोर डॉ. दीक्षित यांच्यासह पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचे संगणकीय सादरीकरण केले.
शिवाजीनगर एसटी बस स्थानकाखाली हे मल्टीमॉडेल एकिकृत भूमिगत स्थानक बनवण्यात आले असून एसटी, रेल्वे स्थानक, पीएमपीएल आणि हिंजेवाडी मेट्रो लाईनशी जोडणी होणार असल्याने प्रवाशांना सर्व वाहतूक सुविधांचा उपयोग घेता येणार आहे. शिवाजीनगर मेट्रो स्थानकाला भेट दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आपल्यासमोर उभा राहील अशा संकल्पनेनुसार या स्थानकाचे डिझाईन करण्यात आले आहे. ऐतिहासिक बांधकामांच्या प्रतिकृतीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण संरचना या बांधकामात वापरण्यात आल्या आहेत, असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांना या स्थानकातील प्लॅटफॉर्म, मेट्रो लाईन तसेच विविध सब-वे च्या कामांची प्रगती दर्शवण्यात आली. नंतर श्री. पाटील यांनी गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकाची पाहणी करुन तिकीट घेऊन वनाज स्थानकापर्यंत मेट्रोतून प्रवास केला.
मेट्रोच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर आपण स्वप्नात आहोत असे वाटते, कल्पनेतील मेट्रो व्यवहारात आली असा अभिप्राय त्यांनी वनाज स्थानकावरील नोंदवहीत नोंदवला.