भाजपच्या पराभवाचे आता ‘अंतिम काऊंटिंग’ सुरु
| ‘भाजपाला विनाशकाले विपरीत बुद्धी’ – मोहन जोशी
शिशुपालाचे शंभर अपराध झाले तसे आता केंन्द्रातील भाजपच्या मोदी सरकारचे झाले असून कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांची खासदारकी गेल्या क्षणापासून कॉंग्रेसने आता रणशिंग फुंकले आहे व अंतिम लढ्याला सुरुवात केली आहे आणि पुढील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्ता भ्रष्ट केल्याशिवाय कॉंग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली.
ते म्हणाले, देशातील महाभयंकर महागाई, बेकारी, कोलमडलेली अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार याविरुद्ध संसदेत मोदी सरकारला धारेवर धरणारे कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे म्हणजे केंद्रातील भाजप सरकारला लागलेली अखेरची घरघर आहे. किंबहुना त्यांच्या या षडयंत्राला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असेच म्हणावे लागेल.
राहुल गांधींच्या रूपाने देशातील जनतेला आश्वासक पर्याय निर्माण झाल्याचे चित्र देशात वाढत राहिल्यामुळेच त्यांचा आवाज बंद करण्यासाठी कटकारस्थानात मास्टरकी असणाऱ्या भाजपने राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी केलेला हा लोकशाही विरोधी प्रयत्न आहे. असे सांगून मोहन जोशी म्हणाले, मात्र देशातील जनता या लोकशाही विरोधी मोदी सरकारला सत्तेवरून दूर करण्यासाठी आता आसुसलेली असून पुण्यातील कसबा विधानसभा असो अथवा भाजपच्या ताब्यातील हिमाचल प्रदेश असो, जनतेने भाजपला धूळ चारली आहे व कॉंग्रेसला विजयी केले आहे. त्यामुळेच स्वतःला महानायक समजणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला धडकी भरली आहे.
गेली ९ वर्षे मनमानी पद्धतीने जनताविरोधी निर्णय घेत मित्र असणाऱ्या मुठभर उद्योगपतींचे खिसे भरण्याचे पाप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले असून, सारा देश अडानीच्या घशात घालण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या महापापाला राहुल गांधी यांनी जोरकस विरोध केला. हे स्पष्ट करून मोहन जोशी म्हणाले की, ‘भारत जोडो’ यात्रेतून साऱ्या देशाला राहुल गांधींनी आपलंसं केलं. त्यांच्यामुळे आपले पंतप्रधानपद व सत्ता जाणार हे ओळखल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साऱ्या भाजपने संसदेत गोंधळ घालून राहुल गांधींना आठ दिवस बोलू दिले नाही आणि पूर्वी रचलेल्या षड्यंत्राप्रमाणे सुरतमधील सत्रन्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून निर्णय घेऊन त्याआधारे राहुल गांधींची खासदारकी रद्द करणे या त्यांच्या महापापामुळे देशातील जनतेत संतापाची लाट आली असून राहुल गांधींची प्रतिमा आता अधिक उंचावली आहे, असे मोहन जोशी म्हणाले.