मीटर खरीदीचे रहस्य काय?
: काँग्रेस गटनेते आबा बागुल यांचा सवाल
पुणे: पुणे शहरात पुणेकर नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा व्हावा यासाठी 24 बाय 7 ही योजना आखण्यात आली होती. त्या योजनेचे नाव बदलून आता समान पाणी वाटप योजना असे नामकरण करण्यात आले आहे. याचाच अर्थ सर्व पुणेकरांना समान दाबाने समान पाणीपुरवठा होईल असे अपेक्षित आहे. असे असताना सुमारे 500 कोटी रुपये खर्च करून पाण्याचे मीटर का बसवले जातात? जर का समान वाटप असेल तर पाण्याच्या मिटरची आवश्यकताच नाही. आणि त्यासाठी 500 कोटी रुपयांची उधळपट्टी महानगरपालिका का करत आहेत.असा सवाल महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी केला असून मीटर खरेदीचे रहस्य काय आहे? त्याचे गौडबंगाल काय आहे? याचा प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली.
: मीटर रद्द करा
जर का पुणेकरांना किती पाणी वापरले त्यानुसार पाण्याचे बिल दिले जाणार होते तर त्यासाठी मीटर पद्धती योग्य होती. परंतु सर्वांना समान पाणी पुरवठा होणार असेल तर त्यासाठी 500 कोटी खर्च करून महानगरपालिका मीटर का बसवत आहे. का हे पैसे पाण्यात घालायचे आहेत असा प्रश्न विचारून आबा बागुल म्हणाले कि, जर का पाण्याचा एकूण किती वापर झाला आहे. याची माहिती हवी असेल तर पाण्याचा मूळ स्रोत असणाऱ्या मोठ्या पाण्याच्या लाईन आहेत. त्यावर जर का मोठे मीटर बसवले.तर दररोज एकूण किती पाणी पुणे शहराला दिले याचा आकडा मिळू शकतो. त्यासाठी प्रत्येक घराला मीटर लावणे गरजेचे नाही. आता काही ठिकाणी असे मीटर लावले आहेत त्यांची दुरवस्था झालेली आहे लोकांनी ते काढून फेकून दिले आहेत. जर समान पाणी पुरवठा होणार आहे तर मीटर बसवण्याचा पुनर्विचार प्रशासनाने तातडीने करावा व त्यासाठी वापरण्यात येणारे 500 कोटी रुपये नव्याने समाविष्ट झालेल्या 23 व 11 गावांच्या पाणी पुरवठ्याच्या कामांना वापरावे याचा देखील पर्यायाने विचार करावा. एकीकडे कर्ज काढायचे,बॉण्ड घ्यायचे, पैसे नाही म्हणून छोटी छोटी कामे बंद करायची आणि नको तिथे एवढी मोठी उधळपट्टी करायची असे सांगून बागुल म्हणाले 500 कोटीचे मीटर रद्द करावे. त्याबाबत प्रशासनाने तातडीने खुलासा करावा अन्यथा काँग्रेस पक्षाला या विरोधात ठाम भूमिका घ्यावी लागेल असा इशारा त्यांनी दिला.
COMMENTS