सनसिटी ते कर्वेनगर पुलाचे काम लवकर सुरु करा
| माजी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
सिंहगड रस्त्यावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी मुठा नदीवर सनसिटी ते कर्वेनगर प्रस्तावित असलेल्या उड्डाणपूलाचे काम तातडीनं सुरू करण्यात यावे. तसेच माणिकबाग ते सनसिटी पर्यायी रस्त्याचे काम लवकर सुरु करावे. अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
सध्या राजाराम पुल आणि पुणे-मुंबई महामार्गावरील वीर बाजी पासलकर उड्डाणपूल या दोन्ही पुलांवर रहदारीचा भार मोठा आहे. सनसिटी ते कर्वेनगर दरम्यानचा प्रस्तावित पूल झाल्यास सिंहगड रस्त्यासह, कोथरूड, कर्वेनगर भागातील नागरिकांना दोन्ही बाजूला ये-जा करणे अत्यंत सोपे होणार आहे. या पर्यायी पुलामुळे सिंहगड रस्त्यावरील कोंडी फुटण्यास मदत होणार असल्याने नागपूरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
महापालिकेकडून या पूलासाठी आवश्यक असलेली भूसंपादनाची प्रक्रीया जवळपास पूर्ण केली असून पूलासाठी सल्लागार नेमण्याचे काम सुरू आहे. हे काम तातडीनं झाल्यास सिंहगड रस्त्यावरील वाहतूकीतून दिलासा मिळणार आहे.
या शिवाय माणिकबाग येथील इंडियन ह्युम पाईप कंपनी ते सनसिटी पर्यंतही रस्ता प्रस्तावित असून या रस्त्याचे भूसंपादन वेळेत झाल्यास सिंहगड रस्त्यावरून माणिकबाग येथून थेट कर्वेनगरला जाणारा पर्यायी रस्ता उपलब्ध होईल. परिणामी वाहतूक कोंडी आणि इंधनबचत झाल्याने प्रदूषणाची समस्याही कमी होणार असल्याने ही दोन्ही कामे तातडीनं मार्गी लावावी अशी मागणी नागपूरे यांनी केली आहे.