Special Article | वेगाची प्रगती की अधोगती….!!!

Homesocialमहाराष्ट्र

Special Article | वेगाची प्रगती की अधोगती….!!!

Ganesh Kumar Mule Oct 05, 2023 7:41 AM

Your life is 100% your Responsibility | वयाच्या 40 व्या वर्षी, तुम्ही हे समजण्यासाठी पुरेसे हुशार असले पाहिजे | काय आहे ते समजून घ्या
How to Find Peace in Chaotic Situation | सर्वात गोंधळलेल्या आणि उन्मादपूर्ण परिस्थितीत शांतता कशी मिळवायची? | 4 सिद्ध झालेले मार्ग…
Yoga Day | Health | जागतिक योग दिनानिमित्त लेख | बदलती जीवनशैली आणि योग

Special Article | वेगाची प्रगती की अधोगती….!!!

        रस्त्यासाठी वाहन आहे, की वाहनासाठी रस्ता आहे. हेच आज कळेनासे झाले आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनाची गर्दी पाहिल्यानंतर कुणाच्याही मनामध्ये प्रश्न पडतो, की ही वाहन येतात कुठून आणि जातात कुठे ? या वाहनाची प्रचंड गर्दी रस्त्यावर आहे. ही वाहनं इकडून तिकडं अगदी सुसाट वेगामध्ये जात आहेत. कोणत्या कामासाठी जातात? त्यांची काय कामे आहेत? असे अनेक प्रश्न मनामध्ये फेर धरू लागतात आणि अपेक्षेप्रमाणे  त्याची उत्तरे माञ कुणाकडेच मिळत नाहीत. आज प्रत्येक घरोघरी वाहनाची संख्या खूप वाढलेली आहे. मग त्यामध्ये दोन चाकी असो किंवा चार चाकी असो. डोईप्रमाणे वाहनांची संख्या प्रत्येक घरामध्ये असलेली पाहायला मिळत आहे. घरामध्ये कोणतेही एक वाहन असेल तरीही आपली कामे होतात परंतु आज प्रत्येक जण इतक्या घाईगडबडीमध्ये आहे. प्रत्येकाला वाहनाची आवश्यकता स्वतः गणिक वाटू लागले आहे. घरामध्ये जेवढेही व्यक्ती आहेत त्यांची प्रत्येकाची कामे वेगवेगळ्या ठिकाणी असलेली पाहायला मिळत आहेत.  त्या कामाची किंवा गरजेची पूर्तता करण्यासाठी  प्रत्येकजण आता गाडीवर स्वार होऊ पाहत आहे.
        दारातून बाहेर पाय टाकला की तो पाय गाडीवरच असावा अशी मानसिकता प्रत्येकाची होऊ लागली आहे. कदाचित माणसाच्या गरजा, माणसाची कामे वेगवेगळ्या दिशेला असतील हे कोणीही नाकारू शकत नाही कारण घरापासून भाजी मार्केट लांब असेलही. समजा ते दोन किलोमीटर असेल, मुलांची शाळा दोन किलोमीटर असेल, दवाखाना दोन-तीन किलोमीटर असेल, नातेवाईकांची, मित्रमंडळीची घरे दोन तीन किलोमीटर असतील. तिथपर्यंत जाण्यासाठी आपण वेळेची बचत करतोय हे चांगलेही आहे; पण वाहन आणि माणूस याचे नाते इतके घट्ट झाले आहे की आता माणसाला वाहनांचे व्यसन लागलेली आहे हे नाकारून चालणार नाही. खरोखरच कामासाठी वाहन चालवणाऱ्यांची संख्या आणि एखाद्या कामानिमित्त वाहनाची आवश्यकता नसून अशा वाहन चालवणाऱ्यांची संख्या यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर काहीही काम नसताना वाहन चालवणाऱ्या धारकांची संख्या नक्कीच जास्त आहे. हे कोणीही मान्य करेल. कोणत्या कामासाठी कोणत्या वाहनाची  आवश्यकता आहे. याचा विचार आत्ता प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.
            आजची तरुणाई तर या वेगावर इतकी आरूढ झालेले आहे, की त्यांच्या गाडीचा प्रचंड वेग पाहून, त्यांच्या गाडीचा सायलेन्सरचा आवाज ऐकून कुणाच्याही मनाचा थरकाप उडेल. अशीही तरुणाई अपघाताला बळी पडते ती कायमचा मृत्यू घेऊन किंवा कायमचं अपंगत्व घेऊन. हायवेचं चित्र तर फार विचित्र पाहायला मिळत आहे . ताशी १०० ते १२० च्या वेगाने चाललेल्या गाड्या हे कशाचा द्योतक आहे ?कोणती गडबड आहे? कदाचित त्यांना गडबड असेल तर ही मंडळी लवकर का निघत नाहीत. याचा विचार  आपण कधी करणार आहोत. अशा ह्या अपघाताचे चित्र किंवा प्रसंग आपल्याला हायवेवर सर्रास पाहायला मिळते .तसे तर भारतामध्ये दर चार मिनिटाला एक अपघाती मृत्यू होतो. भारतामध्ये अतिवेगाने गाडी चालवण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे कदाचित अपघाताचे प्रमाणही जास्तच आहे. एखाद्या रोगापेक्षा किंवा एखाद्या आपत्तीपेक्षा कितीतरी जास्त प्रमाण हे वाहन अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे आहे. हे निर्विवाद सत्य आहे. याची आकडेवारी आपल्याला इंटरनेटवर किंवा भारत सरकारच्या ‘रस्ते व वाहतूक परिवहन ‘ संकेतस्थळावर मिळूही शकेल ;पण आपल्याला हा आकड्याचा खेळ न खेळता त्यामध्ये अडकून न राहता प्रत्येकाने जागृत होणं आवश्यक आहे. रोज किती तरी अपघात होतात ते आपल्या हलगर्जीपणामुळे! ते आपल्या दृष्टीलाही पडतात.
परवा असाच एका मुलाचा अपघात पहावा लागला.कानामध्ये इयरफोन लावून तो तरुण  भन्नाट वेगाने गाडी चालवत असताना अपघाताला बळी पडला. कारण काय तर त्याच्या कानामध्ये असलेला इयरफोन. या इयरफोनमुळे पाठीमागून आलेली गाडी कळत नाही ना पुढून आलेली गाडी कळत नाही आणि ही तरुणाई अपघाताला बळी पडते ती अशा छोट्या छोट्या कारणामुळे. तो  मुलगा क्षणार्धात रक्ताच्या थारोळ्यात पडला. आणि अशा परिस्थितीमध्ये कानामध्ये असलेल्या इयरफोनवर गाणं मात्र जोर जोरात चालू असलेलं पाहायला मिळालं.  त्याच गाण्याच्या धुंदीमध्येच तो तरुण शेवटच्या घटका मोजत होता. सर्वांनी त्याला दवाखान्यात नेण्याची, वाचवण्याची धडपड प्रामाणिकपणे केली. परंतु अशा ह्या प्रसंगामधून प्रत्येकाने बोध घेण्याची वेळ आली आहे.  मानवी मनाला कशाचीही शुद्ध राहिली नाही. ना विचारांना बुद्धी. हे चित्र काय सांगते? कुठे चाललोय ? इतके गाड्यांचे व्यसन का लागले आहे? हे  खरोखरच विचार करण्यासारखी बाब आहे.
        अमेरिकी सारखी आपली परिस्थिती नाही. अमेरिकेमध्ये वर सांगितल्याप्रमाणे घरापासून शाळा- महाविद्यालय, दवाखाना, मार्केट, नोकरीचे ठिकाण ही स्थळे लांब- लांब आहेत . कारण भारतापेक्षा अमेरिका क्षेत्रफळाच्या बाबतीत आपल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. त्यामुळे तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार ते योग्यही आहे; पण भारतामध्ये तशी परिस्थिती नाही. आपल्याकडे रस्ते अरुंद आहेत. रस्त्यामध्ये खड्डे आहेत. आणि यामधून वाहन चालवत असताना आपलं मन, शरीर याच्यावर विपरीत परिणाम होत असतो .आपला मानसिक समतोल, मनाची एकाग्रता वाहन चालवताना ढासळत आहे ही प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. वाहन चालवण्याची शिस्त आपल्यामध्ये नाही. ट्रॅफिकमध्ये आपण थांबतो; पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण अनेक नियम पायदळी तुडवून अधून मधून पुढे जाण्याचा मार्ग शोधतच असतो. वाहन चालवण्याची शिस्त आपल्यामध्ये कधी येणार? आपण आपल्या इच्छित स्थळी पायीही जाऊ शकतो पण आता पायी चालणं म्हणजे मागासलेपणाचे वाटू  लागलं आहे. गाडी चालवण्यामध्ये आत्ता प्रतिष्ठा आली आहे. मुंबई ,पुणेची परिस्थिती तर फार वेगळी आहे. कदाचित तिथे रेल्वे जीवनवाहिनी असल्यामुळे माणूस कमीत कमी रेल्वेमध्ये घटकाभर बसतो तरी. पण आपल्यासारख्या अर्बन , निमशहरी भागामध्ये मात्र प्रत्येकाचा अट्टाहास आहे तो गाडीचा. गाडी चालवणाऱ्या तरुणाच्या पाठीमागे जर तरुणी बसली असेल किंवा पुरुषाच्या पाठीमागे जर त्याची पत्नी बसली असेल तर गाडीचा वेग कसा वाढतो हे न सांगणेच बरे. आपण गाडी घेतो तो दुसऱ्याच्या इर्षेमुळे, प्रतिष्ठेमुळे आणि नवीन गाडी घेतल्यानंतर आपण सहज फेरफटका मारतो, काम नसताना उगीचच रोडवर जाण्याचा अट्टाहास करतो.
        गाडीचा वेग वाढवण्यापेक्षा आपण आपल्या विचाराचा वेग वाढवणे आवश्यक आहे. आपल्या विचाराची प्रगती होणे आवश्यक आहे. नाही तरी आपण या सर्व भौतिकसुविधा आपल्या सोयीसाठी घडवून आणू ; पण त्यामधून जर आपल्या प्रगतीला बाधा येत असेल तर अशा भौतिकसुविधाचा उपयोग आपल्या जीवनासाठी प्रगतीची अधोगती कधी करेल हे सांगता येत नाही. आपण अशा मोहात पाडणाऱ्या भौतिक सुविधा पासून चार पावलं किंवा चार हात लांब राहिलेलंच बरं! आपल्याला प्रगती करण्यासाठी या सगळ्या भौतिक सुविधांची आवश्यकता आहेच; पण कोणती वस्तू केव्हा वापरायची हे मात्र आपल्याला कळणे फार गरजेचे आहे. वाहन आपण आपल्या सोयीसाठी घेऊ पण आपण  वाहनावर स्वार होण्याऐवजी वाहनच आपल्यावर स्वार होऊ नये एवढे मात्र एवढे मात्र या ठिकाणी नमूद करावेसे वाटते.
   —-
 –  प्रा. दशरथ ननवरे
  (लेखक  दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
    संपर्क | ८६६९११८५९७