महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांचा टॅक्स विभागातून पायच निघेना!
| अशा कर्मचाऱ्यांना वेतन अदा न करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश
पुणे | सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील उद्दिष्ट पूर्ततेच्या अनुषंगाने कर आकारणी व कर संकलन कार्यालयास इतर विभागातील काही अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यांची नेमणूक 31 मार्च पर्यंत होती. कालावधी संपला तरी या कर्मचाऱ्यांचा टॅक्स विभागातून पाय निघत नाही. हे बघून आता अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी अशा कर्मचाऱ्यांचे वेतन अदा न करण्याचे आदेश खाते प्रमुखांना दिले आहेत.
| अतिरिक्त आयुक्तांचे असे आहेत आदेश
पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील लेखनिकी संवर्गातील वरिष्ठ लिपिक व लिपिक टंकलेखक हुद्यावरील सेवकांना आदेशानुसार कर आकारणी व कर संकलन विभागाकडे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील उद्दिष्ट पूर्ततेच्या प्रशासकिय कामकाजाच्या सोयीसाठी कामाच्या अंतर्गत व्यवस्थेने तात्पुरत्या स्वरुपात दि. ३१.०३.२०२३ पर्यंत नेमणूक करण्यात आली होती.
तथापि, असे निदर्शनास आले आहे की सदर कार्यालयीन आदेशान्वये नेमणूक करण्यात आलेले सेवक अजूनही कर आकारणी व कर संकलन विभागाकडे कामकाज करीत असून ३१.०३.२०२३ नंतरही ते त्यांच्या मूळ खात्यात हजर झालेले नाहीत. सदर सेवकांना कर आकारणी व कर संकलन विभागाने तात्काळ आजच्या आज कार्यमुक्त करून त्याबाबतचा अहवाल आस्थापना विभागाकडे सादर करावयाचा आहे. तसेच संबंधित सेवकांनी त्यांचे मूळ खात्यात रुजू व्हावयाचे असून, सदर सेवक त्यांचे मूळ खात्यात हजर नझाल्यास त्यांचे महिने महाचे वेतन संबंधित खातेप्रमुखांनी आदा करू नये. तरी, संबंधीत खातेप्रमुख यांनी पुढील योग्य ती तजवीज करावी.