सिंधुताई सपकाळ : आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे : राज्यातील हजारो, बेघर, अनाथ मुलांना मायेची सावली देत त्यांना उभे करत मुख्य प्रवाहामध्ये आणणाऱ्या थोर सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ (वय ७५) यांचे मंगळवारी रात्री पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital Pune ) निधन झाले. महिनाभरापासून त्यांच्यावर येथे उपचार सुरू होते.
काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती त्यानंतर त्याची प्रकृती खालावत गेली, आज अखेर हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. सिंधूताईंच्या जाण्याने अनाथांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होते आहे. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. (Sindhutai Sapkal Dies in Pune)
सिंधुताईंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत अनाथांना आधार दिला तसेच अनेक मोठ्या संस्थांची उभारणीही केली. सिंधूताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला होता. नको असताना मुलगी झाली म्हणून घरच्यांनी तिचे नाव ‘चिंधी’ ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. सिंधूताईंना लहानपणापासून ज्ञानार्जनाची ओढ होती पण त्यांना मराठी शाळेत जेमतेम चौथीपर्यंतच शिकता आले. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न झाले होते.
आयुष्यात आलेल्या संकटांशी खंबीरपणे मुकाबला करत त्यांनी अनाथ वंचितांना आधार दिला. सिंधूताईंना लोक प्रेमाने ‘माई’ म्हणत असत. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते. देशपरदेशातील अनेक संस्थांकडून माईंच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून त्यांना साडेसातशे पेक्षाही अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
‘बाल सदन’ची स्थापना
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधूताई यांनी ‘ममता बाल सदन’ संस्थेची स्थापना केली. पुण्याजवळ १९९४ साली पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरू झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. माईंनी उभारलेल्या संस्थेमध्ये लहान मुलांना सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते.
मोठे गौरव
सिंधूताईंना २०१६ मध्ये सामाजिक कार्यासाठी डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्चतर्फे साहित्यात डॉक्टरेट देण्यात आली. सिंधूताई यांना एकूण २७३ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महिला व बालकांसाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांना प्रदान केला जाणारा “अहिल्याबाई होळकर पुरस्कार” त्यांना मिळाला होता. नारी शक्ती पुरस्कार, पद्मश्रीने देखील त्यांचा गौरव करण्यात आला होता. सिंधूताईंच्या जीवनावर आधारित ‘मी सिंधूताई सपकाळ’ हा सिनेमा २०१० साली प्रदर्शित झाला होता. लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्येही तो झळकला होता. सिंधूताई १४०० पेक्षा जास्त मुलांची आई आणि १००० हून अधिक मुलांची आजी आहे.
COMMENTS