Shivaji Maharaj Jayanti | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचे आयोजन

HomeBreaking News

Shivaji Maharaj Jayanti | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचे आयोजन

Ganesh Kumar Mule Feb 19, 2025 5:01 PM

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Sunil Tatkare NCP | राहूल सोलापूरकर सारखी विकृती ठेचलीच पाहिजे | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षस खा. सुनिल तटकरे यांची भूमिका
Shivgarjana Mahanatya  | शिवगर्जना महानाट्याला पहिल्याच दिवशी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद |  महानाट्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन तास उपस्थिती

Shivaji Maharaj Jayanti | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचे आयोजन

| छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार जीवनामध्ये स्वीकारण्याचा संकल्प युवकांनी करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

| विकसित भारताचा संकल्प घेण्यासाठी ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा- केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया

Shivjayanti – (The Karbhari News Service) – छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) दिलेला विचार, अठरापगड जातींना सोबत घेऊन सामान्य माणसाच्या कल्याणाकरिता, महिलांच्या कल्याणाचा, सन्मानाचा विचार आपण देखील आपल्या जीवनामध्ये स्वीकारणार आहोत हा संकल्प युवकांनी करावा. यासाठी ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा उपक्रम उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. (Maharashtra News)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचा शुभारंभ कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग पुणेच्या वसतिगृह मैदानापासून झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ज्यावेळी भारतात अनाचार, अंध:कार होता आणि भारतातील अनेक राजे रजवाडे मुघलांचे मांडलिकत्व पत्करायला उत्सुक होते. मुघलांच्या अधिपत्याखाली काम करत होते. अशावेळी मा जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या सामान्य मावळ्यांना एकत्र करून त्यांना रयतेचे राज्य तयार करण्यासाठी लढाई करण्याची प्रेरणा दिली. त्यानुसार मावळ्यांनी चमत्कार करून दाखवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांनी आपला आत्माभिमान जागृत करून असा अंगार फुलविला की त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार थेट अफगाणिस्तान पर्यंत झेंडे रोवले. संपूर्ण भारतभर स्वराज्य स्थापन करून भारताला स्वराज्याची देण दिली.

ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक लढवय्ये नव्हते तर उत्तम राज्यकर्ते होते. शेतकऱ्यांचे कल्याण, जलसंवर्धन, जंगलांचे संवर्धन, उत्तम स्थापत्यशास्त्राचे नमुने असलेले गड किल्ल्यांचे निर्माण, आरमाराचे निर्माण आदींच्या माध्यमातून अभेद्य तटबंदी, सागरी सुरक्षा आदी बाबी छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकविल्या. त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात व्हावा म्हणून नामांकन केले असून लवकरच त्यांचा जागतिक वारसा स्थळात समावेश होईल.

*विकसित भारताचा संकल्प घेण्यासाठी ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा- केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया*

डॉ. मांडविया म्हणाले, देशाच्या स्वाभिमानासमोर संकट होते अशा स्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा, सन्मानाचा नारा दिला तसेच जनतेच्या कल्याणाची मोहीम चालवली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशाचे नवयुवक विकसित भारताचा संकल्प घेऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाच्या स्वाभिमानासाठी कसे लढता येते, आदर्श शासन कसे चालवता येते, देशाच्या सन्मानासाठी मान न झुकविता कसे लढता येऊ शकते हा वारसा दिला आहे.

शिवाजी महाराजांनी एक आदर्श लोकशाही व्यवस्था, अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून दिली होती. त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक विकास कसा करता येऊ शकतो हे दाखवून दिले. त्याच प्रमाणे आपली लोकशाही आणि संविधानाचे जतन करण्यासाठी आणि देशाला वैभवाच्या उच्च स्थानी नेण्यासाठी आजच्या युवकांनी प्रेरणा घ्यावी यासाठी ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही डॉ. मांडविया म्हणाले.

श्रीमती खडसे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठी एक श्रद्धास्थान, आस्था आहे. त्यांनी ज्याप्रमाणे स्वराज्य स्थापनेसाठी लाखो युवकांना सोबत घेतले. त्याचप्रमाणे आपल्या देशाला पुढे घेऊन जायचे आणि २०४७ पर्यंत विकसित भारताच्या निर्माणासाठीचा संकल्प युवकांनी करावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री. भरणे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव उच्चारल्यास अंगात एक ऊर्जा निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन आपण आपल्या जीवनात वाटचाल ठेवली पाहिजे. या आदर्शाची उजळणी ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा उपक्रमामुळे होणार आहे. राज्यातील युवकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार बरोबरच राज्य शासनही खंबीरपणे उभे आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी विभागीय डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड म.न.पा. आयुक्त शेखर सिंह, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे सचिव अनिल डिग्गीकर, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, क्रीडा प्रबोधिनीचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.

या पदयात्रेचे सीओईपी कॉलेज मैदान ते एस.एस.पी.एम.एस. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जंगली महाराज रस्ता ते झाशीची राणी पुतळामार्गे खंडूजीबाबा चौक, छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते फर्ग्युसन महाविद्यालय मार्ग या मार्गाने आयोजन करण्यात आले.

या पदयात्रेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस,केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मांडविया, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे, श्री. मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. भरणे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांच्यासह शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.
0000