महानगरपालिकेत 2017 पासून झालेल्या भ्रष्टाचाराची CAG मार्फत चौकशी करण्याबाबत शिवसेनेचे आंदोलन
भारतीय जनता पार्टीची (Bhartiya Janata Party) सत्ता असलेल्या पुणे महापालिकेच्या गेल्या पाच वर्षातील कामाची ‘कॅग’मार्फत (CAG) चौकशी करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आज पुणे महापालिकेच्या आवारात आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला पुण्यातील सेनेचे सर्व पदाधिकारी व आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षात पुणे महाापलिकेत विकास कामांच्या अनेक योजना आल्या. मात्र, त्यावर कोट्यवधी रूपयांचा खर्च झाला. प्रत्यक्षात कामे झालीच नाहीत. या कामांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला. स्मार्ट सिटी, जायकाचा नदी सुधार प्रकल्पासारख्या योजना योग्यरित्या मार्गी लागू शकल्या नाहीत, असा शिवसेनेचा आरोप आहे.
महापालिकेसमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात महिला आघाडीच्या सहकाऱ्यांची संख्यादेखील मोठी होती. पुण्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींवरून तणावात भर पडत आहे. त्यामुळे आजच्या आंदोलनाला शिवसेनेच्या शहर पातळीवरील सर्व प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक तसेच शिवसैनिक उपस्थित होते.