समाविष्ट गावामधून राष्ट्रवादीला मिळणारा पाठींबा पाहून भाजपने गावातले टँकर बंद केले
: राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप
पुणे : महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांना प्राथमिक सुविधा पुरविण्यातही सत्ताधारी भाजप अपयशी ठरलं आहे. त्यातही मानवाच्या आयुष्यातील जीवनावश्यक घटक असलेले पाणी पुरवण्याबाबत सत्ताधारी भाजपने अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. तात्पुरती सोय म्हणून टँकरने पाणीपुरवठा केला जात होता परंतू सत्ताधाऱ्यांनी आता हे टँकरही बंद केले आहेत. असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस ने केला आहे. या गावांतील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने याचा तीव्र निषेध करण्यासाठी तसेच या गावांना तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आले.
: अतिरिक्त आयुक्तांना टँकर भेट
यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांना पाण्याचा प्रतीकात्मक टँकर भेट दिला. याबाबत प्रशांत जगताप म्हणाले, वास्तविक पाहता ही गावे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर तातडीने त्यांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागायला हवा होता. मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून भारतीय जनता पक्षाने केवळ जाहिरातबाजीवर लक्ष केंद्रित केले आहे. समाविष्ट २३गावातील नागरिकांना स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवत तब्बल ३४ कोटीचा टॅक्स गोळा करणारी सत्ताधारी भाजपा प्रत्यक्षात नागरिकांच्या प्राथमिक सुविधाही पुरवू शकत नाही हे सिद्ध झाले आहे. अनेक निवडणूक सर्वे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समाविष्ट गावांमध्ये मोठ्या प्रमाणात काम करत असून या समाविष्ट गावांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळणारा वाढता पाठिंबा लक्षात घेता त्यामुळेच अशा प्रकारचं घाणेरडे राजकारण भारतीय जनता पार्टी करू पाहत आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पुणेकर नागरिक याची नक्की दखल घेतील अशी घणाघाती टिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली. या आंदोलनास पुणे महानगरपालिकेच्या विरोधीपक्षनेत्या दिपाली धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्ताधारी भाजपचा धिक्कार असो, पुणेकरांना हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी पुणे महानगरपालिकेचा परिसर दणाणून गेला होता. नव्याने समाविष्ट गावांतील अनेक नागरिकांनीही या आंदोलनात सहभाग घेऊन सत्ताधारी भाजपच्या निष्क्रिय राजवटीचा निषेध केला.
COMMENTS