संतोष तांदळे यांच्याकडील मलनिःस्सारण विभागाचा पदभार काढून घेतला
पुणे | महापालिका प्रशासनाकडून संतोष तांदळे यांच्याकडे मलनिःस्सारण देखभाल व दुरुस्ती विभागाच्या अधीक्षक अभियंता विभागाचा पदभार देण्यात आला होता. मात्र त्यांच्या कार्यपद्धतीवर महापालिका प्रशासन नाराज आहे. त्यामुळे त्यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. हा पदभार आता कार्यकारी अभियंता श्रीधर येवलेकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
मागील दोन दिवसात शहरात जोराचा अवकाळी पाऊस झाला. यात प्रशासनाच्या चुकीमुळे पुणेकरांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. कारण ड्रेनेज आणि रस्ते दुरुस्ती साठी करोडो रुपये खर्चून देखील रस्त्यावर पाणीच पाणी साठले होते. याचे मुख्य कारण होते ड्रेनेज व्यवस्थित साफसफाई न होणे. साफसफाई नसल्याने पाणी जायला जागा उरली नाही. त्यामुळे पाणी रस्त्यावरच थांबून राहिले. यामुळे शहर वासियांना याचा फटका बसला. शहरातील बहुतेक रस्त्यावर हीच अवस्था होती. याबाबत पथ विभागाला विचारणा केली असता पथ विभागाने ड्रेनेज विभागाकडे बोट दाखवले. तर ड्रेनेज विभाग म्हणतो कि साफसफाई चे अजून टेंडर प्रक्रियाच झाली नाही. ड्रेनेज विभागाचा हलगर्जीपणा यासाठी कारणीभूत आहे.
संतोष तांदळे यांच्याकडे ड्रेनेज ची जबाबदारी होती. त्यांनी ही जबाबदारी व्यवस्थित न पाळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय या अगोदर देखील तांदळे यांच्या कार्यपद्धतीवर बऱ्याच जणांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.