Sahyadri Super Speciality Hospital | सह्याद्री रुग्णालयाकडून महापालिका आरोग्य विभागाने मागवला खुलासा!
PMC Helath Department – (The Karbhari News Service) – डेक्कन जिमखाना परिसरातील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत पती आणि पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना समोर येताच महापालिका आरोग्य विभागाने सह्याद्री रुग्णालय कडून वस्तुस्थिती दर्शक अहवाल मागवला आहे. नुकतेच तशी नोटीस रुग्णालयाला दिली आहे. अशी माहिती महापालिका सहायक आरोग्य अधिकारी डॉ सुर्यकांत देवकर यांनी दिली. (Dr Suryakant Deokar PMC)
डेक्कन जिमखाना परिसरातील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणानंतर पती आणि पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यकृत प्रत्यारोपणानंतर पतीचा त्याच दिवशी मृत्यू झाला, तर दाता असलेल्या पत्नीचा सात दिवसांनी मृत्यू झाला. रुग्णांच्या नातेवाईकांनी या प्रकरणी रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे.
बापू बाळकृष्ण कोमकर (वय ४९) आणि कामिनी कोमकर (वय ४२, रा. हडपसर)असे मृत्यू झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. बापू कोमकर यांना यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. त्यामुळे त्यांना यकृत देण्यासाठी पत्नी कामिनी पुढे आल्या. डेक्कन परिसरातील सह्याद्री रुग्णालयात १५ ऑगस्टला प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच बापू कोमकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सात दिवसांनी २२ ऑगस्टला कामिनी यांचा मृत्यू झाला. कामिनी यांना कोणत्याही व्याधी नव्हत्या. तरीही, त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान महापालिका आरोग्य विभागाकडे याची तक्रार प्राप्त झाली नव्हती. महापालिका आरोग्य विभागाने माध्यमावरील बातम्यांचा आधार घेत रुग्णालयाला नोटीस जारी केली आहे.

COMMENTS