महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांना फरकाची रक्कम मिळण्यास सुरुवात
पुणे | महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांना (PMC Retired Employees) सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) फरकाची रक्कम देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. रक्कम लवकर मिळत नव्हती, यामुळे याबाबत मनपा सेवानिवृत्त सेवक संघ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आगामी काळात ज्या खात्यांचे फरकांच्या बिलाचे कामकाज प्रलंबित राहिल्यास व त्यामुळे कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्यास संबंधित विभागाचे खातेप्रमुख (HOD) जबाबदार राहतील. अशी तंबी मुख्य व लेखा अधिकारी यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिली होती. त्यानुसार आता रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे.
दिनांक १.१.२०१६ ते दिनांक ३१.१०.२०२१ या कालावधीमध्ये मनपा सेवेतून वयोपरत्वे सेवानिवृत्त / ऐच्छिक सेवानिवृत झालेल्या सर्व मनपा अधिकारी/कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनाच्या फरकाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम आदा करणेबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल), पुणे मनपा यांचे कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये आदेश देण्यात आले होते. (PMC Pune)
पुणे मनपाच्या संबंधित सर्व खात्याच्या बिल क्लार्क यांनी त्यांचे संबधित खात्याकडील दिनांक १.१.२०१६ ते दिनांक ३१.१०.२०२१ या कालावधीत सेवानिवृत्त / ऐच्छिक सेवानिवृत्त झालेल्या सर्व मनपा अधिकारी / कर्मचारी यांचे सुधारित वेतनाच्या फरकाच्या बिलांबाबतची आवश्यक ती संगणक प्रणाली (Version) पुणे मनपाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून उपलब्ध करून घेऊन त्याप्रमाणे बिले तयार करावयाची आहेत. तसेच सदरची बिले सातव्या वेतन आयोग समितीकडून तपासून घेऊन त्याबाबतच्या सर्व अंतिम नोंदी सेवानिवृत्त सेवकांचे सेवापुस्तकात करणेबाबत त्याचप्रमाणे मुख्य लेखापरीक्षक विभागाने सूचित केल्यानुसार संबधित सेवानिवृत्त सेवकांचे सेवापुस्तकात सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतनाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम आदा केल्याबाबतची नोंद घेऊन तसेच सुधारित बेसिकप्रमाणे पेन्शन आकारणी करून अशी पेन्शन प्रकरणे निवृत्तीवेतन विभागाकडे त्वरित पाठविणेबाबत व सेवानिवृत्त सेवकांना
सुधारित वेतनाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम आदा करण्याचे काम दिनांक ३०.११.२०२२ पर्यंत पूर्ण होईल, याबाबतची दक्षता घेणेबाबत वरील संदर्भाकित कार्यालयीन परिपत्रकान्वये मनपाच्या सर्व खातेप्रमुख यांना सूचित करणेत आले होते. (7th pay commission) तरीही हे काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांनी ३१ डिसेंबर ची अंतिम मुदत दिली होती. बिलाचे कामकाज प्रलंबित राहिल्यास व त्यामुळे कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्यास संबंधित विभागाचे खातेप्रमुख (HOD) जबाबदार राहतील. अशी तंबी मुख्य व लेखा अधिकारी यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिली होती. त्यानुसार आता बिले तयार करण्याचे काम सुरु आहे. शिवाय रक्कम ही जमा करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.