Rehabilitation | Pune Metro | PMC | मेट्रो बाधित कुटुंबाचे पुनर्वसन झाशीची राणी शाळेत!   | महामेट्रोला 30 वर्षासाठी शाळा दिली जाणार भाड्याने 

HomeBreaking Newsपुणे

Rehabilitation | Pune Metro | PMC | मेट्रो बाधित कुटुंबाचे पुनर्वसन झाशीची राणी शाळेत!   | महामेट्रोला 30 वर्षासाठी शाळा दिली जाणार भाड्याने 

Ganesh Kumar Mule Nov 05, 2022 1:14 PM

PMP CMD | महापालिकेचा बावधन येथील बंगला पीएमपी सीएमडीना भाडे तत्वावर दिला जाणार 
TP Scheme | उरुळी देवाची  व फुरसुंगी  टीपी स्कीम | हरकती सूचनांचा अहवाल सरकारकडे पाठवला जाणार 
Draft DP of 11 villages | PMC Pune | समाविष्ट 11 गावांचा प्रारूप विकास आराखड प्रसिद्ध करण्यासाठी 1 मार्च पर्यंत मुदतवाढ! | शहर सुधारणा समितीची मान्यता

मेट्रो बाधित कुटुंबाचे पुनर्वसन झाशीची राणी शाळेत!

| महामेट्रोला 30 वर्षासाठी शाळा दिली जाणार भाड्याने

पुणे | पुणे शहरात राबविण्यात येणाऱ्या पुणे महामेट्रो प्रकल्पांतर्गत महात्मा फुले मंडई येथील भुयारी मेट्रो  स्टेशनच्या कामामुळे बाधित होणाऱ्या लंके वाडा, शुक्रवार पेठ, सि.स.नं. ९ या जागेतील निवासी कुटुंबाचे पुनर्वसन करणेसाठी पुणे मनपाच्या सदाशिव पेठ येथील कवठे अड्डा किंवा झाशीची राणी शाळेची जागा तात्काळ मंजूर करून जागेचा ताबा पुणे मेट्रो रेल प्रकल्पास हस्तांतरण करण्याची वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यानुसार झाशीची राणी शाळा महामेट्रोला 30 वर्षासाठी भाड्याने दिली जाणार आहे. त्यासाठी 6 कोटीचे प्रीमियम आकारून प्रत्येक वर्षी  1 रुपया भाडे घेतले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मनपा प्रशासनाकडून शहर सुधारणा  समिती समोर ठेवण्यात आला आहे.

समितीच्या प्रस्तावानुसार  महामेट्रोने केलेल्या मागणीच्या अनुषंगाने सदाशिव पेठ येथील कवठे अड्डा आणि झाशीची राणी शाळेच्या जागेची संयुक्त पाहणी करण्यात आलेली आहे. तथापि, सदर ठिकाणी सन २०१७ च्या मान्य विकास आराखड्यानुसार अनुक्रमे चिल्ड्रन प्ले-ग्राऊंड (सी.पी.जी) आणि पब्लिक-सेमी पब्लिक (पी.एस.पी. झोन) दर्शविले आहेत. सदर जागेवर पुणे मनपामार्फत क्रिडा संकुल आणि झाशीची राणी शाळा उभारण्यात आली आहे. सदर दोन्ही जागा हस्तांतरीत करण्यासाठी स्थानिक नागरीक व सभासद यांनी विरोध दर्शविला आहे. तसेच, सी.पी.जी आरक्षणाच्या जागेबाबत न्यायालयीन वाद सुरू आहे. तथापि,  महापालिका आयुक्त यांच्या समवेत वेळोवेळी झालेल्या बैठकिच्या अनुषंगाने सदाशिव पेठ सि.स.नं. ७८९ झाशीची राणी शाळेची जागा उपलब्ध करून देणेबाबतचा निर्णय झालेला आहे.

सदाशिव पेठ सि.स.नं. ७८९ झाशीची राणी शाळा ही पब्लिक-सेमी पब्लिक (पी.एस.पी.झोन) दर्शविण्यात आली असून पी.एस.पी. झोनमधील सर्व वापर अनुज्ञेय असलेबाबत कळविले आहे. त्यामुळे सदर ठिकाणी निवासी इमारत उभारणेसाठी आरक्षण बदल अथवा जागा वापर बदल करणे बंधनकारक होणार आहे. खात्याकडील उपलब्ध रेकॉर्डनुसार सदर जागा ही मुलींची शाळा क्र. ४ या करीता दि. १३/०५/१९२१ रोजी तडजोडीने पुणे मनपाच्या ताब्यात आल्याचे दिसून येत आहे. मिळकतपत्रिकेनुसार जागेचे क्षेत्रफळ हे १५२२.६० चौ.मी इतके आहे. सदर जागेमधील काही क्षेत्र हे रस्तारूंदीमध्ये गेले आहे. तथापी, महामेट्रोने जागेची मोजणी करून त्याची प्रत या विभागास सादर केलेली आहे. त्यानुसार जागेवर सुमारे १२३४.८५ चौ.मी इतके क्षेत्रफळ आहे. सन २०२२-२३ च्या शिघ्रसिध्दगणकानुसार जागेची किंमत ही
र.रू.६,६२,९९,०९७/-इतकी होत आहे.

 शाळेची संपूर्ण इमारत ही सद्यस्थितीत कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयाच्या ताब्यात असून सदर ठिकाणी त्यांचे कामकाज चालू आहे. तसेच, पुढील मोकळ्या जागेमध्ये अतिक्रमण विभागाने कारवाई केलेल्या हातगाड्या तसेच, इतर साहित्य ठेवण्यासाठी वापरत असल्याचे निदर्शनास येते. दुमजली इमारत ही दगडी असून सुस्थितीत आहे. जागेची चालू बाजारभावानुसार होणारी जागेची किंमत र.रु. ६२,९९,०९७/- मेट्रोकडून वसूल करण्यात यावी व सदर जागेवरील आरक्षण बदल करण्याची कार्यवाही ही मेट्रोने स्वतः करून सद्यस्थितीत शाळेच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या कार्यालयांची पर्यायी व्यवस्था ही मेट्रोने करावी असे ठरले आहे. मेट्रोच्या कामकाजाकरीता झाशीची राणी शाळेची जागा तात्काळ रिकामी करून मेट्रोसाठी दिर्घ कालावधीकरीता हस्तांतरीत करावी लागणार आहे. त्यानुसार  झाशीची राणी शाळेची सुमारे १२३४.८५ चौ.मी जागेचा ताबा प्रिमियम रक्कम रू.६,६२,९९,०९७/- इतकी महामेट्रोकडून आकारून ३० वर्षे कालावधीकरीता पुणे मनपाच्या स्वामित्वापोटी दरवर्षी र.रू.१/- या दराने महामेट्रोस हस्तांतरीत केली जाईल.