Rajnath Sing in Pune | काँग्रेस ज्याच्या गळयात पडते त्याचे बुडणे निश्चित; केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची टीका
| उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी बुडणार
| सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन
MLA Siddharth Shirole – (The Karbhari News Service) – काँग्रेस पक्षाची स्थिती नाजूक बनली आहे, त्यामुळे ते ज्यांच्या गळ्यात पडतात त्या पक्षांचे बुडणे निश्चित आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गळयात पडली आहे, त्यामुळे या पक्षांचे बुडणे नक्की असल्याची टीका केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केली. काँग्रेसची स्थिती बिकट असून ती आपल्या पायावर पुन्हा उभी राहू शकत नसल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. (Shivajinagar Assembly Constituency)
छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणारे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी सिंह यांच्या सभेचे आयोजन खडकीतील आलेगावकर शाळेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी सिद्धार्थ शिरोळे, भारतीय जनता पक्षाचे महाप्रांत प्रमुख राजेश पांडे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, माजी नगरसेविका सुनीता वाडेकर, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, अॅड. एस. के. जैन आदी उपस्थित होते.
यावेळी राजनाथ सिंग यांचा शिंदेशाही पगडी घालून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भेट देऊन सन्मान करण्यात आला. या सभेला मोठ्या संख्यने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिरोळे यांच्या विकासनाम्याचे राजनाथसिंग यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
महाविकासआघाडीमध्ये सहभागी झालेल्या उद्धव ठाकरे यांना काय झाले आहे, त्यांनी कोणाच्या बरोबर समझोता केला आहे, असा सवाल राजनाथसिंग यांनी यावेळी उपस्थित केला. महाआघाडीचे सरकार सत्तेमध्ये असताना महाराष्ट्र त्यांच्यासाठी एटीएमचे मशीन होता, त्यांनी राज्याचे काय भले केले. काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला काही राज्यामध्ये अपेक्षित यश मिळाले नाही, त्यामध्ये हरियाणा, महाराष्ट्र यांचा समावेश होता. नुकत्याच हरियाणामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तिथल्या जनतेने भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवत सत्ता दिली. महाराष्ट्रामध्ये देखील त्याचीच पुनरावृत्ती होणार असून महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये येणार आहे. सरकार चालवण्याची कला भारतीय जनता पक्षाकडे असल्याचे राजनाथसिंग यावेळी म्हणाले.
दहा वर्षांपासून केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या सरकारने केलेल्या कामामुळे जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. भारत जे बोलतो ते जग कान देऊन ऐकत असतो. देशाने केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. देशातील श्रीमंतांच्या यादीमध्ये भारताने जगात पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. २०२७ मध्ये भारत तिसऱ्या स्थानावर येईल, असेही सिंग यांनी सांगितले.
केंद्र सरकारने राबवलेल्या उज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना यांचा जनतेला फायदा होत आहे. राज्यात काम करणारे महायुतीच्या सरकारने देखील जनहिताची कामे केली आहेत. भारतासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले योगदान खूपच मोठे आहे, काँग्रेसने त्यांचा योग्य सन्मान केला का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
जुन्या पुणे मुंबई महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. संरक्षण खात्याच्या जमिनीमुळे तो प्रश्न प्रलंबित राहिला होता, पण राजनाथसिंग यांनी त्यामध्ये लक्ष घातल्यामुळे हा प्रश्न सुटल्याचे सांगत सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे अनेक प्रश्न आहेत. निधीच्या कमतरते अभावी इथल्या कर्मचाऱ्यांचे पगार, नागरी समस्या यांची सोडवणूक करणे कठीण बनले आहे. खडकीचा विकास व्हायचा असेल तर त्याचा पुणे महापालिकेत समावेश करण्याची आवश्यकता आहे, त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडून आपल्याकडे पाठवू.” महायुतीच्या सरकारने खडकीच्या विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी दिला होता, त्याचा वापर करून अनेक प्रश्न सोडवले असल्याचे शिरोळे यांनी नमूद केले.
COMMENTS