Rajeev Gandhi Zoo | राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील चितळ प्राण्यांच्या मृत्युबाबत अजून अचूक निदान नाही | महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला खुलासा
Pune News – (The Karbhari News Service) – राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात ०७ जुलै अखेर नर ३९ व मादी ६० असे एकूण ९९ चितळ प्राणी होते. तथापी ०७ ते १२ जुलै पर्यंत आजारपणाबाबत कोणतीही पूर्व लक्षणे न दाखविता एकुण १५ चितळ मृत पावले आहेत. प्राण्यांच्या मृत्युच्या कारणाबाबत अद्याप अचूक निदान होऊ शकलेले नाही. अशी माहिती मुख्य उद्यान अधीक्षक डॉ अशोक घोरपडे आणि संग्रहालयाचे संचालक डॉ राजकुमार जाधव यांनी दिली. (PMC Garden Department)
मृत प्राण्यांच्या शरीराचे अवयव व रक्ताचे नमुने तपासणीसाठी भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, बरैली येथील National Referral Centre for Wildlife Diseases Monitoring and Prevention, ICAR चे National institute on Foot and Mouth Disease, भुवनेश्वर ओरिसा, National Institute of high security animal diseases, भोपाळ, विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुणे, विभागीय वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र गोरेवाडा, नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
तसेच चितळांच्या आरोग्य व उपचारा सम्बंधित भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, बरैली येथील National Referral Centre for Wildlife Diseases Monitoring and Prevention येथील शास्त्रज्ञांशी तसेच प्राणीसंग्रहालयांच्या आरोग्य सल्लागार समितीतील तज्ञांशी सल्लामसलत करून मार्गदर्शन घेण्यात येत आहे.
उर्वरित चितळ खंदकाच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करून परिसरातील प्राण्यांवर प्राणीसंग्रहालयातील पशुवैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांद्वारे निरीक्षण ठेवण्यात येत आहे . तसेच इतर प्राण्यांच्या आरोग्य अबाधित राहावे याकरिता प्राणी संग्रहालयातय आवश्यक जैवासुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
१३/०७/२०२५ पासून उर्वरित चितळ प्राण्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होत असल्याचे निदर्शनास आले असुन आज दिनांक १५.०७ २०२५ रोजी पर्यंत एकही चितळ प्राण्याच्या मृत्युची नोंद नाही. असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
——-
प्रशासनाने दक्षता घेण्याची आमदार हेमंत रासनेंची विधानसभेत मागणी
कात्रज येथील प्रसिद्ध राजीव गांधी प्राणी संग्रहालयात मागील मागील चार ते पाच दिवसांत तब्बल १४ हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विषाणूजन्य आजाराने हरणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार हेमंत रासने यांनी हरणांच्या मृत्यूचा मुद्दा विधानसभेत मांडत प्रशासनाने इतर प्राण्यांना धोका होऊ नये, यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
“कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय गेली दोन दिवसात 14 हरणांचा अचानक मृत्यू झाला असून अद्याप पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला नाही. साथीच्या रोगामुळे असे झाल्याची शक्यता आहे, त्यामुळे इतर प्राण्यांना त्याचा काही प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी तातडीने शासनाने योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत” अशी मागणी रासने यांनी केली आहे..
याबद्दल बोलताना हेमंत रासने म्हणाले, “कात्रजच्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात १४ हरणांचा मृत्यू ही अतिशय दुर्दैवी व धक्कादायक घटना आहे. या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा निर्माण झाला आहे. अद्याप पोस्टमार्टम अहवाल न आलेला असला, तरी साथीच्या रोगाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इतर प्राण्यांना धोका होऊ नये, यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. प्रशासनाने दक्षता घ्यावी. प्राणीसंग्रहाल पुणे शहरासह राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण असल्याने प्राण्यांची सुरक्षितता महत्वाची आहे.
COMMENTS