पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महागाई, बेरोजगारीच्या रावणाचे प्रतीकात्मक दहन
गेल्या आठ वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सातत्याने वाढणारी महागाई, सुशिक्षित तरुणांवर आलेले बेरोजगारीचे संकट, अन्नधान्यावरील जीएसटी, इंधन दरवाढ, विकास कामांमधील भ्रष्टाचार, सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण, सातत्याने देशातील विविध भागात सुरू असणाऱ्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना, शेतकरी बळीराजाच्या आत्महत्या, सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार, केंद्र सरकारची लोकशाही विरोधी धोरणे या सर्व अन्यायकारक व जुलूमकारक गोष्टींमुळे भारतातील जनता त्रस्त झाली आहे. अनेक वेळा आंदोलने, मोर्चे, निवेदने देत लोकशाहीच्या मार्गाने केलेल्या विरोधाने देखील केंद्र सरकारला जाग येत नाही, त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला देशातील या दृष्ट प्रवृत्तींच्या रावणाचे दहन करण्यात आले. तसेच “महागाईचा रावण जाळलाच पाहिजे…,बेरोजगारीचा रावण जाळलाच पाहिजे….,धार्मिक द्वेष करणारा रावण जाळलाच पाहिजे….” या घोषणा देत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. भारतीय नागरिकांवर या गोष्टी लादणाऱ्या भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा दृढ निश्चय देखील युवकांनी यावेळी केला.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “देशातील युवक हा देशाच्या विकासाचा प्रमुख शिलेदार असतो परंतु हाच युवक आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशाच्या राजसत्तेच्या विरोधात बंड पुकारत आहे. केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपने बेरोजगारीमुळे युवकांवर ही वेळ आणली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने देखील ज्या दृष्ट प्रवृत्तीचे रावण दहन झाले आहे, त्या दृष्ट प्रवृत्ती देशातील युवक,युवती, महिला यांसह समाजातील प्रत्येक घटकासाठी अतिशय घातक आहेत. या सर्व गोष्टी आपल्या जनतेवर लादण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केले आहे. आज या महागाईमुळे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरातून बचत ही जवळपास हद्दपार झाली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने केवळ आपली नोकरी, व्यवसाय, छोटा मोठा काम- धंदा करणे व त्यातून जमा झालेल्या पैशात आपल्या कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी ज्या काही जीवनावश्यक गोष्टी खरेदी करतील, त्या प्रत्येक गोष्टीवर भरमसाठ टॅक्स भरणे केवळ हेच कालचक्र सध्या सुरू आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यकाळात भारतीय नागरिकांची परिस्थिती श्रीलंकेतील नागरिकांसारखी होण्याची दाट शक्यता आहे. ही परिस्थिती जर उद्भवू द्यायची नसेल तर गल्लीपासून -दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी नावाच्या दृष्ट राक्षसाचा वध करणे हे ही काळाची गरज बनली आहे.
या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख ,युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे,विशाल वाकडकर, मनोज पाचपुते,महेश हांडे, अजिंक्य पालकर,रोहन पायगुडे,कुणाल पोकळे, ॲड.निखिल मलानी,मंगेश मोरे,स्वप्निल जोशी,योगेश सुतार,गजानन लोंढे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.