Pune Property Tax Abhay Yojana | पुणे शहर आणि समाविष्ट गावातील मिळकतधारकांसाठी महत्वाची बातमी | मिळकत कर विभागाची विशेष अभय योजना!
| थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या दंडाच्या रकमेवर ७५% सूट
Pune Propoerty Tax – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील आणि समाविष्ट गावातील सर्व मिळकतधारकांसाठी महत्वाची योजना आणण्यात आली आहे. करदात्यांना थकीत दंडावर ( Penalty) विशेष सूट देण्यासाठी अभय योजना २०२५ – २६ ही १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ कालावधीपर्यंत राबविण्यात येणार आहे. अभय योजनेत थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या दंडाच्या रकमेवर ७५% सूट मिळणार आहे. या योजनेत महापालिकेला दंडावर ७५ टक्के सवलत दिल्यानंतर ६ हजार ७५२ कोटी इतके माफ करावे लागणार आहेत. (Pune Municipal Corporation Property Tax Department)
यापूर्वी (वर्ष २०१५-१६,२०१६-१७, २०२०-२१ व २०२१-२२) या अभय योजनेत ज्या मिळकतधारकांनी लाभ घेतला आहे, त्या मिळकतधारकांना या अभय योजनेत लाभ दिला जाणार नाही. असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishore Ram IAS) यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिका मिळकत कर विभागाच्या वतीने पुणे शहरातील सर्व थकीत करदात्यांना असे आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी “अभय योजना २०२५-२६ चा लाभ घ्यावा.
संपूर्ण कर ( थकबाकीसह) एकरकमी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्र, बँ ऑफ महाराष्ट्र, आय.सी.आय.सी.आय. बँक, जनता सहकारी बँक व कॉसमॉस बँक तसेच ऑनलाईनद्वारे भरणेकरिता propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर भरता येईल. पुणे महानगरपालिकेचे सर्व नागरी सुविधा केंद्र शनिवारी व रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील सुरु राहतील. असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
| एकूण थकबाकी ही १३ हजार ९७ कोटी
मिळकत कर विभागाच्या माहितीनुसार एकूण ६ लाख ३७ हजार ६०९ इतक्या लोकांनी महापालिकेचा मिळकत कर थकवला आहे. यात पुणे शहर आणि समाविष्ट गावांचा समावेश आहे. त्यांच्याकडील एकूण थकबाकी ही १३ हजार ९७ कोटी आहे. यातील २ टक्के दंडावर ७५ टक्के सवलत दिल्यानंतर ७ हजार ९६ कोटी इतके माफ करावे लागणार आहेत. तर महापालिका ६ हजार कोटी इतकी थकबाकीची रक्कम मिळवू शकते.
| मागील योजनांचा लाभ घेतलेले १ लाख ४० हजार ४३७ मिळकत धारक
दरम्यान महापालिका प्रशासनाने ही योजना राबवताना असा निर्णय घेतला आहे, वर्ष २०१५-१६,२०१६-१७, २०२०-२१ व २०२१-२२ या अभय योजनेत ज्या मिळकतधारकांनी लाभ घेतला आहे, त्या मिळकतधारकांना या अभय योजनेत लाभ दिला जाणार नाही. असे एकूण १ लाख ४० हजार ४३७ लोक आहेत. याचाच अर्थ असा कि, सद्यस्थितीत महापालिका ४ लाख ९७ हजार १७२ मिळकत धारकांनाच या योजनेचा लाभ देणार आहे. या लोकाकडील थकबाकी ही १२ हजार १६१ कोटी इतकी आहे. यातील २ टक्के दंडावर ७५ टक्के सवलत दिल्यानंतर ६ हजार ७५२ कोटी इतके माफ करावे लागणार आहेत. म्हणजे महापालिका ५ हजार ४०९ कोटी इतकी रक्कम वसूल करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महापालिका प्रशासनाला विश्वास आहे कि या योजनेत किमान १ हजार कोटी इतका महसूल मिळेल.
| मागील अभय योजनांचा कसा झाला फायदा
मिळकत कर विभागाच्या वतीने २०१५-१६,२०१६-१७, २०२०-२१ व २०२१-२२ या सालात अभय योजना राबवली होती. यात २०२५-१६ साली राबवलेल्या योजनेत महापालिका प्रशासनाला २२१ कोटी इतकी रक्कम मिळाली होती. एकूण थकबाकी ही १९३१ कोटी इतकी होती. त्यावेळी एकूण २ लाख ९४ हजार ३३० इतके थकबाकीदार होते. त्यातील १ लाख ६ हजार ९०३ इतक्या लोकांनी अभय योजनेचा लाभ घेत कर भरला होता. २०१६ – १७ साली राबवलेल्या योजनेत महापालिका प्रशासनाला ३११ कोटी इतकी रक्कम मिळाली होती. त्यावेळी एकूण २ लाख ९१ हजार १७६ इतके थकबाकीदार होते. त्यातील ९० हजार ३५७ इतक्या लोकांनी अभय योजनेतील ७५ टक्के सवलतीचा लाभ घेत कर भरला होता. त्यावेळी एकूण थकबाकी २१२२ कोटी होती. २०२०-२१ साली राबवलेल्या योजनेत महापालिका प्रशासनाला ४८५ कोटी इतकी रक्कम मिळाली होती. तर थकबाकी ही २८६८ कोटी इतकी होती. त्यावेळी एकूण ४ लाख ९२ हजार १३८ इतके थकबाकीदार होते. त्यातील १ लाख ४९ हजार ६८३ इतक्या लोकांनी अभय योजनेतील ७५ टक्के सवलतीचा लाभ घेत कर भरला होता. २०२१ – २२ साली राबवलेल्या योजनेत महापालिका प्रशासनाला १४४ कोटी इतकी रक्कम मिळाली होती. त्यावेळी एकूण ३ लाख ३९ हजार २४६ इतके थकबाकीदार होते. त्यातील ६६ हजार ४५४ इतक्या लोकांनी अभय योजनेतील ७५ टक्के सवलतीचा लाभ घेत कर भरला होता. त्यावेळी थकबाकी ही २२४८ कोटी इतकी होती.

COMMENTS