Pune PMC News | पुणे महापालिकेत महाप्रीत मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचा आढावा | राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
Madhuri Misal – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका व महात्मा फुले नवीनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मार्य.(महाप्रीत) यांच्या संयुक्त विद्यमान पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत या प्रकल्पांचा आढावा मुंबई (बीकेसी) येथील महाप्रीत कार्यालयात मंगळवारी घेण्यात आला . या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास व सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ होत्या. (Pune Municipal Corporation – PMC)
या बैठकीस महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक श्री. माळी, पुणे महानगरपालिकेचे सिटी इंजिनिअर प्रशांत वाघमारे, उपायुक्त महेश पाटील, विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा सेकटकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनवणे तसेच महाप्रीतचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली:
विद्युत दिवे एलईडीमध्ये रूपांतर : नव्याने समाविष्ट गावांमध्ये विद्युत पोलवरील जुने दिवे एलईडी तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक दिव्यांमध्ये बदलण्याचे महत्त्वाकांक्षी काम सुरू असून, एकूण ७०,००० विद्युत दिवे टप्प्याटप्प्याने बदलण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत सुमारे ९,००० दिव्यांचे रूपांतर पूर्ण झाले आहे. यामुळे ऊर्जेची बचत होण्याबरोबरच देखभाल खर्चातही मोठी घट होणार आहे.
सौरऊर्जेचा प्रभावी वापर : स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ५० मेगावॅट क्षमतेच्या सौर विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. याबाबत शासन स्तरावरून प्रकिया सुरू असुन पुढील कालावधीत हा प्रकल्प पुर्ण केला जाणार आहे यासोबतच
इंटरनेट कमांड सेंटर व आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने पुणे शहरात एकात्मिक आदेश व नियंत्रण केंद्र (ICCC) स्थापन करण्यात येणार आहे. सुमारे २८३ कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, सार्वजनिक सुरक्षितता, जल व घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या सेवा एका केंद्रीकृत प्लॅटफॉर्मवर नियंत्रित केल्या जाणार आहेत. यामुळे पुणे शहराचे व्यवस्थापन अधिक वेगवान व कार्यक्षम होणार आहे.
बैठकीत बोलताना राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना कामांची गती वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. “प्रकल्पांची गुणवत्ता अबाधित ठेवत, वेळेचे काटेकोर नियोजन करावे व नागरिकांना वेळेत सुविधा मिळाव्यात, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
तसेच, पुणेकरांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आणि नव्याने समाविष्ट गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका आणि महाप्रीत यांच्यातील सहकार्यामुळे पुणे शहराचे स्वरूप अधिक विकसित आणि स्मार्ट सिटीच्या दिशेने जलदगतीने पुढे जात आहे, हे या बैठकीतून स्पष्ट झाले.

COMMENTS