Pune PMC News | आचारसंहिता संपल्यावर एकत्रित तीन वर्षाचे महर्षी वाल्मिकी पुरस्काराचे वितरण! | महापालिका आयुक्तांचे नगरसचिव विभागाला आदेश
PMC Award – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation-PMC) वतीने महर्षी वाल्मिकी पुरस्कार बऱ्याच वर्षापासून दिला जातो. मात्र गेल्या तीन वर्षापासून हा पुरस्कार देण्यात आलेला नाही. याबाबत आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावेळी आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी आचारसंहिता संपल्यावर एकत्रित तीन वर्षाचे महर्षी वाल्मिकी पुरस्काराचे वितरण करण्याचे आदेश नगरसचिव विभागाला (PMC Municipal Secretary Department) दिले आहेत.
महर्षी वाल्मिकी पुरस्कार हा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना तसेच लेखक, कवी, आर्थिक, सामाजिक, आणि शैक्षणिक उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. पूर्वी या पुरस्काराची रक्कम २५ हजार आणि पारितोषिक अशी होती. मात्र २०१७ च्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रक्कम देणे बंद करण्यात आले असून फक्त मानपत्र देण्यात येते. दरम्यान पुरस्कारासाठी व्यक्ती किंवा संस्थांची निवड करण्यासाठी एका समितीची नेमणूक करण्यात आली आहे.
कोरोना काळात हे पुरस्कार दिले गेले नव्हते. त्यानंतर महापालिकेत प्रशासक आले. त्यांनी देखील पुरस्कार देण्याबाबत फार गंभीरता दाखवली नाही किंवा नगरसचिव विभागाने देखील तसा पुढाकार घेतला नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून हे पुरस्कारच दिले गेले नाहीत. याबाबत नुकतीच सफाई कर्मचारी समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा झाली. काही सदस्यांनी या पुरस्काराचा विषय चर्चेत आणला. यावेळी महापालिका आयुक्त यांनी आचारसंहिता संपल्यावर एकत्रित तीन वर्षाचे महर्षी वाल्मिकी पुरस्काराचे वितरण करण्याचे आदेश नगरसचिव विभागाला दिले आहेत.
– गेल्या ४ वर्षापासून एकही पुरस्कार दिला गेला नाही
महापालिका जवळपास विविध १३ पुरस्कार देते. यामध्ये बालगंधर्व पुरस्कार, लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार, महर्षी वाल्मिकी पुरस्कार, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार, कै. जयवंतराव टिळक पुरस्कार, स्व. पंडित रोहिणी भाटे पुरस्कार, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी पुरस्कार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार, संत शिरोमणी जगनाडे महाराज पुरस्कार, मदर तेरेसा पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, या पुरस्कारांचा समावेश आहे. कोरोना काळापासून पुरस्कार देणे बंद झाले. त्यानंतर महापालिकेत प्रशासक राज आले. तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनी पुरस्कार देण्याबाबत कुठली रुची दाखवली नाही. मात्र आताचे प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी याची गंभीर दखल घेत पुरस्कार देण्याबाबत आदेश दिले आहेत.
COMMENTS