PMC Election 2022 | प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
सुप्रीम कोर्टाकडून पुणे महापालिका निवडणुकीसाठी केलेल्या प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात समाधान आहे.
राज्य सरकारच्या सत्ता संघर्षानंतर नव्याने स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारने महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीचा चुकीचे दिशेने प्रवास चालू करत, निवडणुका चार सदस्य प्रभाग पद्धती प्रमाणे घ्याव्यात असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले. हा एकूणच देशातील लोकशाही व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकशाही संपवण्याचे कट कारस्थान आहे थेट आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला होता.
राज्यातील महानगरपालिकांच्या (Corporation) निवडणुका पुढे ढकलून राज्य सरकार ७३ व्या घटना दुरूस्तीने झालेल्या कायद्याचा अवमान करीत आहे. ही भूमिका सर्वोच्च न्यायालयात (Suprme Court Of India) मांडली असून या संदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.
त्यानुसार सुप्रीम कोर्टाकडून आता पुण्याच्या प्रभाग रचना बदलला स्थगिती मिळाली असल्याची माहिती समोर येत आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसणार आहे.