पथारी व्यावसायिकांच्या प्रतिनिधींची निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात!
| महापालिकेने मागवल्या हरकती सूचना
गेल्या एक ते दीड वर्षापासून रखडलेली शहरातील पथारी व्यावसायिकांच्या प्रतिनिधींची निवडणूक प्रक्रिया अखेर महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. निवडणुकीसाठीची 22,899 नोंदणीकृत पथारी व्यावसायिकांची यादी महापालिका प्रशासनाने शनिवारी संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या यादीवर पुढील 15 दिवसांत हरकती आणि सूचना नोंदविता येणार आहेत.
केंद्र शासनाच्या पथ विक्रेता (पथ विक्रेता व उपजिविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) 2014 नुसार, पथारी व्यावसायिकांच्या शहर फेरीवाला समितीसाठी पथपदाथावरील विक्रेत्यांचे प्रतिनिधी निवडणुकीद्वारे निवडण्यात येणार आहेत. या निवडणुकीसाठीची 22,899 नोंदणीकृत पथारी व्यावसायिकांची यादी महापालिका प्रशासनाने शनिवारी संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या यादीवर पुढील 15 दिवसांत हरकती आणि सूचना नोंदविता येणार आहेत. महापालिकेची 15 क्षेत्रीय कार्यालये, पाच परिमंडळे तसेच अतिक्रमण विभागात या मतदार याद्या उपलब्ध असून, त्यावर 5 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. या हरकतींच्या सुनावनीनंतर अंतिम मतदार यादी जाहीर करून पालिकेकडून पथारी व्यावसायिक प्रतिनिधींची निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी महापालिकेकडून गेल्या दोन वर्षांपासून कामगार आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र, करोनामुळे ही प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नव्हती.
—
नगरविकास विभागाने फेरीवाला समितीसाठी पथारी संघटनांचे प्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. या निवडणूकीसाठी हजार मतदारांची प्रारूप यादी जाहीर केली आहे. ही मतदार यादी अंतिम झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणूक पार पडेल.
– माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग