Pune Model School | उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते पुणे मॉडेल स्कूल, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन; आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण

HomeBreaking News

Pune Model School | उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते पुणे मॉडेल स्कूल, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन; आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण

Ganesh Kumar Mule Jun 14, 2025 8:07 PM

Shivneri : Dr Sachin Punekar : शिवजयंतीनिमित्त ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाचे किल्ले शिवनेरीवर अनावरण
Maharashtra Women Policy | राज्याचं चौथं महिला धोरण ही जागतिक महिला दिनाची भेट
Maharashtra Budget | राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या बाबतीत अजित पवार विक्रमाच्या वाटेवर!

Pune Model School | उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते पुणे मॉडेल स्कूल, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन; आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण

 

Pune News- (The Karbhari News Service) –  बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेता शैक्षणिक परंपरेला आधुनिकतेची जोड देण्याकरीता शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करण्याची गरज आहे, शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून नवीन पिढी घडविण्याकरीता गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच गुणवत्ता वाढीसाठी पुरेपूर प्रयत्न करावे. राज्यात विविध प्रयोगशील शिक्षक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवित असून त्यांच्या उपक्रमाचे इतर शिक्षकांनीही अनुकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. (Ajit Pawar)

 

पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने श्री गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित पुणे मॉडेल स्कूल, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार सुनील शेळके, बापूसाहेब पठारे, ज्ञानेश्वर कटके, शंकर मांडेकर, बाबाजी काळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.

शैक्षणिक दर्जा सुधारण्याकरीता राज्य शासनाचा पुढाकार
श्री. पवार म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, याकरीता राज्य शासनाच्यावतीने अंगणवाडी पासून पदव्युत्तर शिक्षणाकरीता १ लाख कोटी रुपये खर्च करण्यात येतो. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अंगणवाडी, प्राथमिक शाळेच्या खोल्या उभारण्याकरीता अग्रक्रम देण्यात येत आहे. जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यास राज्यातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. हजारो वर्षापासून मराठी भाषेचे असलेले अस्तित्व टिकविण्यासाठी इंग्रजी शाळेत पहिलीपासून मराठी भाषा शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व सुविधांनीयुक्त उत्कृष्ट ‘शालेय शिक्षण भवन’ उभारण्यात येत असून लवकर त्याचे उद्धघाटन करण्यात येणार आहे. राज्यशासनाच्यावतीने सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व निधीअंतर्गत मोठया प्रमाणात निधी मिळण्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहे, याकरीता विविध सामाजिक संस्था, विविध कंपन्या प्रतिसाद देत आहेत.

सरपंच आणि ग्रामपंचायतीने गावातील शिक्षणाची जबाबदारी घ्यावी
शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी सरपंच आणि ग्रामपंचायतीने सामाजिक जबाबदारी ओळखून गावातील शिक्षणाची जबाबदारी घेऊन शिक्षण लोकचळवळ झाली पाहिजे. ग्रामसभेत शाळा कामकाजाचा आढावा घ्यावा, प्रत्येक गावात शैक्षणिक मेळावे घ्यावेत. शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. उच्च् पदावर कार्यरत अधिकाऱ्यांनी विद्यार्थी या नात्याने शाळेला मदत केली पाहिजे. शाळेचा दर्जा सुधारण्याकरीता शैक्षणिक क्षेत्रात पारदर्शकता, गुणवत्ता, दर्जा वाढीसोबतच आवश्यकतेप्रमाणे बदल केले पाहिजे. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत असून याप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात वापर करण्याचे आवाहन श्री. पवार यांनी केले.

शिक्षणामुळे जीवनातील आव्हाने पेलण्याकरीता स्वत:ला सक्षम आणि संयमी बनविण्याचे कार्य
नागरिकांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. सुशिक्षित नागरिक देशाच्या वैचारिक आणि सामाजिक जडणघडणीत अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचे आचार, विचार, उच्चार हे विकसित होत असतात. शिक्षणामुळे पुरोगामी सत्यशोधक पद्धतीने विचार करण्याची सवय लागते, सुसंस्कृत समाज घडतो, शिक्षण मानवाला विचार करण्याची ताकद देते, अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देते तसेच जीवनातील आव्हाने पेलण्याकरीता स्वत:ला सक्षम आणि संयमी बनविण्यासोबतच आपले हक्क व कर्तव्य व जबाबदारीची जाणीवही होते. आपला देश, समाज सुखी, समृद्ध, सुसंस्कृत घडविण्यासाठी शिक्षण हाच उत्तम पर्याय आहे म्हणून शिक्षणाकडे भविष्यातील गुंतवणूक म्हणून बघितले पाहिजे, यासर्व गोष्टींचा विचार करता राज्यशासनाने शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. शिक्षणाची चळवळ उभी केली असून ही चळचळ अधिक मजबूत करण्याकरीता समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे.

शैक्षणिक क्षेत्रात आधुनिकतेची जोड देण्याकरीता पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने 3 हजार 456 शाळांमध्ये ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमामुळे आरोग्य सेवेला डिजीटल, स्वयंपूर्ण, सर्वसमावेशक करण्यासोबतच सर्व सुविधांनीयुक्त ग्रामीण आरोग्य सेवेचा नवा चेहरा ठरतील. आगामी काळात पुणे मॉडेल शाळा, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र या दोन्ही उपक्रमामुळे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात गुणात्मक बदल घडविण्यास उपयोगी ठरतील, त्यामुळे हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व संबंधित अधिकारी, शिक्षक, सामजिक संस्था, नागरिकांनी योग्य समन्वय राखून काम करावे. याकामी शिक्षकांना प्रशिक्षित करुन त्यांना सक्षम करणे, त्यांच्या कार्याची दखल घेणे आपली जबाबदारी आहे. आगामी काळात राज्यशासनाच्यावतीने ‘पुणे मॉडेल शाळा’ आणि ‘मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र’ उपक्रम राज्यभर राबविण्याबाबत विचार करण्यात येईल, शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या कार्याला राज्यशासन नेहमी सहकार्य करेल, असेही श्री. पवार म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून शासनाचे सर्वतोपरी सहकार्य-दादाजी भुसे

राज्यातील विविध भागात आदर्श शिक्षक पवित्र भावनेतून विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे पवित्र कार्य करीत असून अशा आदर्श शिक्षकांची माहिती संकलित करण्याचे काम करण्यात येत आहे. आगामी काळात शिक्षकांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे राहील, विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून शासन सहकार्य करेल.

पहिलीच्या मराठी माध्यमांसाठी सीबीएससी पटर्नच्या शाळेत जे चांगले उपक्रम राबविण्यात येतात ते उपक्रम मराठी शाळेमध्ये राबविण्यात येतील. पालकांच्या मनामध्ये सीबीएससी पॅटर्नबद्दल कुतूहल आहे. त्यामुळे या शाळेंच्या चांगल्या गोष्टी स्वीकारून विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञान देण्याचे कार्य शिक्षण विभाग करणार आहे. मराठी माध्यमांच्या शाळांसाठी पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठीचा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी संख्येची मर्यादा आहे त्यामुळे येणाऱ्या काळात इतर विभागांचे सहकार्य घेऊन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची संख्या वाढण्याचे काम विभागाने हाती घेतले आहे.

यापुढे शाळांच्या शैक्षणिक सहली शेतकऱ्यांच्या शेतावर, गड किल्ले, मोठ्या बँका, प्रकल्प या ठिकाणी नेण्यात येतील. यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे आरोग्य पत्रिका तयार करण्याचा संकल्प शिक्षण विभागाने केला असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेमार्फत शैक्षणिक क्षेत्रात बदल घडविण्याकरीता करण्यात आलेल्या सामजस्य करारामुळे येत्या काळात विद्यार्थ्यांना भविष्याच्या दृष्टिकोनातून लाभ मिळणार आहे. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताकरीता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री महोदय, खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधी शाळेत उपस्थित राहणार असून नागरिक, पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. भुसे यांनी यावेळी केले.

शिक्षकांचा गुणवत्तेचा दर्जा वाढविण्याकरीता प्रयत्न करणे गरजेचे- डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, विविध शाळा आधुनिक होत असतांना शिक्षकांचा गुणवत्तेचा दर्जा वाढविण्याचे आपल्यासमोर आव्हाने असून याकरीता प्रयत्न करण्याची गरज आहे. शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक विचार, शाश्वत विकासाची उद्दिष्टे, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबत विकसीत भारताकडे वाटचाल करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत विचार करावा.

असर संस्थेच्या अहवालानुसार पुणे जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाने सुट्टीच्या काळात विद्यार्थ्याचे उन्हाळी वर्ग घेतले आहेत, याबद्दल जिल्हा परिषद आणि पालकांचे अभिनंदन केले. राज्यातील शाळेत ‘सखी सावित्री समिती’ शाळेत स्थापन करण्यात आली असून या माध्यमातून शैक्षणिक प्रगती आणि मुलींची सुरक्षितता होण्यास मदत झाली आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये शाश्वत विकासाची ध्येय आणि दुर्ग किल्ल्याच्या विकासाच्याकरीता विशेष लक्ष दिले आहे, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

श्री. पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात 3 हजार 546 शाळांपैकी 303 शाळा या पुणे मॉडेल स्कूल व 108 पुणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्याकरीता जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे केवळ आधुनिकीकरण करण्यासोबतच त्या माध्यमातून दर्जेदार आणि सर्वसमावेशक सेवा देणे हा मुख्य उद्देश आहे, असे श्री.पाटील आपल्या प्रास्ताविकात म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते पुणे मॉडेल स्कुल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन; मॉडेल स्कुल लोगो तर श्री. भुसे यांच्या हस्ते ‘पुणे निपुण’ डॅशबोर्डचे अनावरण करण्यात आले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या उपस्थितीत पुणे मॉडेल स्कुल उभारणीकरीता सामाजिक उत्तर दायित्व निधीच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या एकूण 7 संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले तसचे ‘ज्ञानदर्शन’ कृतीपुस्तिका संचाचे अनावरण तसेच ‘मुख्यमंत्री माझी शाळा सूंदर शाळा’ टप्पा क्र.२ जिल्ह्यातील विजेत्या शाळांना पारितोषिक प्रदान करुन गौरविण्यात आले.

कार्यक्रमापूर्वी श्री. पवार यांच्या हस्ते हुंडई मोटर इंडिया फाउंडेशनच्यावतीने मावळ तालुक्यातील टाकवे आणि येळसे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या दोन अत्याधुनिक अॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच शाळा, ग्रामीण आणि दुर्गम भागात कौशल्य शिक्षणाचा प्रसार, शिक्षक व प्रशिक्षकांना प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण देणाऱ्या प्रयोगशाळेचे लोकार्पण करण्यात आले.