Pune Metro News | पुणेकरांसाठी बातमी | खराडी-खडकवासला आणि नळस्टॉप ते माणिकबाग (३१.६ किलोमीटर) मार्गिकांना मान्यता | मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांवर केंद्राची मोहोर
Pune News – (The Karbhari News Service) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पुणे मेट्रोच्या ३१.६ किलोमीटर अंतराच्या दोन विस्तारित मार्गिकांना मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणे मेट्रो शहराच्या चारही बाजूला विस्तारणार असून पुण्याची सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान होणार आहे. (Pune Metro Route)
शहरातील मेट्रो मार्गाच्या विस्तारासाठी खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. मेट्रो मार्गांच्या मंजुरीसाठी मोहोळ यांनी नगरविकास मंत्री मनोहर लाल खट्टर यांची नुकतीच भेट घेतली होती.
बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात मार्गिका क्रमांक 4 – खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला व मार्गिका क्रमांक 4 अ नळस्टॉप-वारजे-माणिकबाग या दोन मार्गिकांचा समावेश आहे. या दोन्ही मार्गिकांसाठी हडपसर हे इंटरचेंज स्थानक असेल. या दोन्ही उन्नत (एलिव्हेटेड) मार्गिकांची एकत्रित लांबी ३१.६० किलोमीटर असून त्यावर एकूण २८ स्थानके असतील. यासाठी ९८५७ कोटी ८५ लाख रुपये खर्च अपेक्षित असून हे काम पाच वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
या नव्या मार्गिकांमुळे शहरातील रहिवासी भाग, आयटी पार्क व बाजारपेठांशी मेट्रोने जोडला जाईल. तसेच या दोन्ही मार्गिका सध्याच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मार्गिकांच्या जवळून धावणार असल्याने मोठ्या प्रमाणावर कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल,असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने कायमच शहरांच्या सर्वांगीण, सुनियोजित आणि शाश्वत विकासावर भर दिला आहे. त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या विस्ताराला प्राधान्य दिले गेले आहे. मेट्रो हा त्यातील प्रमुख घटक असून शहरातील मेट्रोचे जाळे लवकरच शंभर किलोमीटरहून अधिक विस्तारेल, असे मोहोळ यांनी नमूद केले.
पुणेकरांसाठीच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यातील महत्त्वाचा घटक असलेल्या पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांना मान्यता दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी पुणेकरांच्या वतीने आभार मानतो. यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचेही मी आभार मानतो, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले.

COMMENTS