Pune Metro News | मेट्रो पुणेकरांच्या सोयीसाठी की, भाजपच्या राजकीय फायद्यासाठी – माजी आमदार मोहन जोशी

HomeBreaking News

Pune Metro News | मेट्रो पुणेकरांच्या सोयीसाठी की, भाजपच्या राजकीय फायद्यासाठी – माजी आमदार मोहन जोशी

Ganesh Kumar Mule Sep 25, 2024 6:17 PM

PMRDA Latest News | 8 वर्ष झाली तरी PMRDA चे ऑडिट नाही! | मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
Petrol-Diesel Price | राज्यात पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त 
NCP Agitation | बोट दाखवा, बोट थांबवा | भाजपाच्या विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपरोधिक आंदोलन

Pune Metro News | मेट्रो पुणेकरांच्या सोयीसाठी की, भाजपच्या राजकीय फायद्यासाठी – माजी आमदार मोहन जोशी

 

Pune Metro News – (The Karbhari News Service) – अवघ्या ३२ किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ वर्षात वारंवार पुण्यात येतात भूमिपूजन, उदघाटन असे कार्यक्रम करतात, सभा घेतात आणि पुन्हा कार्यक्रमासाठी येतायत, तेव्हा असं वाटतं की, हा मेट्रो प्रकल्प पुणेकरांच्या सोयीसाठी आहे? की भारतीय जनता पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी? अशी टीका प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत बोलताना केली. (Mohan Joshi Pune Congress)

मेट्रोच्या स्वारगेट ते जिल्हा न्यायालय या भुयारी मार्गाचे लोकार्पण आणि स्वारगेट ते कात्रज विस्तारित मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या गुरुवारी होत आहे. या अगोदर ५ वेळा महामेट्रोच्या कार्यक्रमासाठी मोदी पुण्यात प्रत्तक्ष आले होते आणि एका टप्प्याचे उदघाटन त्यांनी कलकत्ता येथून आभासी पद्धतीने केले होते. मेट्रो मार्गाच्या भूमिपूजनासाठी दिनांक २४ डिसेंबर २०१६ रोजी मोदी पुण्यात आले होते आणि त्या निमित्ताने त्यांनी कृषी महाविद्यालयाच्या मैदानात सभा घेतली होती. डिसेंबर २०१८ मध्ये हिंजेवाडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या भूमिपूजनासाठी ते पुण्यात परत आले होते आणि बालेवाडी स्टेडियमवर त्यांनी सभा घेतली. दिनांक ६ मार्च २०२२ रोजी गरवारे ते वनाज मार्गाचे उदघाटन मोदी यांनी केले आणि कोथरूडमध्ये एमआयटी कॉलेजच्या ग्राउंडवर त्यांनी सभा घेतली.

दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल क्लिनिक या टप्प्याचे उदघाटन त्यांनी केले आणि शिवाजीनगर पोलीस ग्राऊंडवर सभा घेतली. दिनांक ६ मार्च २०२४ रोजी कलकत्याहून त्यांनी आभासी पद्धतीने रुबी हॉल ते रामवाडी या टप्प्याचे उदघाटन आणि पिंपरी चिंचवड महापालिका भवन ते निगडी या मार्गाची कोनशिला त्यांनी बसवली आणि आता ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मार्गाच्या उदघाटनासाठी उद्या (गुरुवारी) येत आहेत आणि स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर सभाही घेणार आहेत. विधानसभा निवडणूका जवळ आल्याने राजकीय फायद्यासाठी सभा घेण्याचा खटाटोप चालला आहे, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

मेट्रो चा पहिला टप्पा सुद्धा अजून पूर्ण झालेला नाही. तरीही मोदी महामेट्रोचा सातवा कार्यक्रम करीत आहेत. भाजप मोठी विकासकामे करीत असल्याचा देखावा निर्माण करून एक प्रकारे पुणेकरांची शुद्ध फसवणूक करीत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी लोहगाव विमानतळाच्या टर्मिनलचे उदघाटन मोदी यांनी केले. त्यानंणर पाच महिने उलटूनही टर्मिनल कार्यान्वित झाले नाही. त्या पाठोपाठ केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुन्हा उदघाटन केले, त्यालाही दोन महिने उलटून गेले. परिस्थिती जैसे थे आहे. ही स्टंटबाजी भाजप का करीत आहे? असा सवाल मोहन जोशी यांनी केला आहे.

भाजपकडे विकासाची दृष्टी नाही, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. त्यासाठी हे खटाटोप चालू आहेत. मेट्रोच्या ३२ किलोमीटर अंतराच्या प्रकल्पासाठी पंतप्रधानपदावरील व्यक्ती वारंवार पुण्यात येऊन कार्यक्रम करते, हेही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनाला पटत नाही, असे मोहन जोशी म्हणाले.

*पुणेकरांनी अजून किती वर्ष त्रास सहन करायचा*

मेट्रो प्रकल्प हा काँग्रेस पक्षाने आणला. प्रकल्पाकरिता आवश्यक त्या मंजुऱ्याही काँग्रेस सरकारने मिळवल्या २०१४ नंतर हा प्रकल्प वेगाने पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु भाजपमधील अंतर्गत मतभेदांमुळे प्रकल्पाला विलंब होत गेला. प्रकल्प ११हजार कोटींचा होता. विलंबामुळे खर्च वाढत गेला. मेट्रो आल्यास वाहतुकीच्या कोंडीतून सुटका होईल, या आशाही मावळल्या. वाहतुकीच्या त्रासातून सुटका कधी होईल? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत, असेही मोहन जोशी यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0