Pune Loksabha 2024 | Sunil Devdhar | पुणे लोकसभेसाठी भाजपकडून सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा!
Pune Loksabha 2024 | लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) तयारी अंतिम टप्प्यात आहे. पुढील महिन्यात आचारसंहिता देखील लागू शकते. कुठल्याही पक्षाने आपले पत्ते उघड केले नसले तरीही सर्वांची अंतर्गत तयारी जोरदारपणे सुरु आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपचा (BJP) उमेदवार कोण असेल याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. कारण गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनाने ही जागा रिक्त आहे. यासाठी आता नवीन उमेदवार कोण असणार? गेल्या काही दिवसापासून मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता सुनील देवधर (Sunil Devdhar) हे नवीनच नाव चर्चेत आले आहे. भाजप नेहमी नवीन चेहऱ्याच्या शोधात असते. तोच धागा पकडून भाजपने हा नवीन उमेदवार शोधला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
कोण आहेत सुनील देवधर?
सुनील देवधर (जन्म 29 सप्टेंबर 1965). त्यांनी ईशान्य भारतातील माय होम इंडिया या एनजीओची स्थापना केली.
2010 मध्ये, ते सक्रिय राजकारणात सामील झाले आणि जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्ष, भारतीय जनता पार्टी (भाजप) च्या ईशान्य भारत संपर्क सेलचे राष्ट्रीय संयोजक म्हणून नियुक्त झाले. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सलग ३ वेळा निवडणूक लढविणारे तत्कालीन मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी त्यांनी गुजरातमध्ये पूर्णवेळ विस्तारक म्हणून काम केले. गुजरातमधील त्यांच्या मेहनतीने प्रभावित होऊन पंतप्रधान मोदींनी त्यांची वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी प्रचार व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर, 2016 मध्ये, त्यांची 2 दशकांहून अधिक काळ मार्क्सवादी पक्षाने राज्य केलेल्या त्रिपुरा राज्याचे पक्षाचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली. तत्कालीन भाजप अध्यक्ष श्री अमित शहा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, पंतप्रधान मोदींच्या प्रचंड लोकप्रिय प्रतिमेसह, त्यांच्या जमिनीवर कठोर परिश्रम करून, ते राज्यातील २५ वर्षांची कम्युनिस्ट राजवट संपवण्याचे प्रमुख साधन बनले. ते भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि जुलै २०१८ ते जुलै २०२३ पर्यंत आंध्र प्रदेशचे सह-प्रभारी होते. २०१८ मध्ये ते भाजप आंध्र प्रदेशचे सह-प्रभारी बनले.
दरम्यान मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक हे आपण उमेदवार असण्याची आस लावून आहेत. त्या दिशेने त्यांचे प्रयत्न देखील सुरु आहेत. मुळीक यांनी बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाश झोतात राहण्याचा प्रयत्न केला होता. मोहोळ आणि मुळीक हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. असे असले तरी लोकसभेच्या उमेदवाराचा निर्णय ही केंद्रीय टीम करणार आहे. तसेच भाजप नेहमी ऐन वेळेला नवीन चेहरा देत असते. त्यानुसार या टीम ने सुनील देवधर यांच्या नावाला पसंती देण्याची तयारी चालवली आहे, अशी माहिती भाजपच्या गोटातून मिळाली. अशी देखील चर्चा आहे कि देवधर यांचा प्रचार बड्या उद्योगपतींच्या माध्यमातून सुरु आहे.
दरम्यान लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याबाबत कोर्टाच्या आदेशाने भाजपची गोची झाली आहे. कारण पोटनिवडणुकीची भाजपची सध्या तरी कुठली तयारी दिसत नाही किंवा भाजप त्या मनःस्थितीत नाही.
दरम्यान इकडे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्टवादी चे देखील अजून काही ठरलेले नाही. लोकसभेची जागा परंपरागत रित्या काँग्रेस कडे राहिलेली आहे. मागील वेळी मोहन जोशी यांना आपला करिष्मा दाखवता आला नव्हता. यावेळी काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर किंवा अरविंद शिंदे यांना संधी देऊ शकते. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रशांत जगताप यांचे नाव देखील काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. मात्र आघाडीचे अजून तरी काही ठरलेले नाही.
मनसे ने मात्र आधीच आपला उमेदवार घोषित केला आहे. वसंत मोरे ना उमेदवारी दिली जाणार आहे. त्या दिशेने मोरेंनी आपली तयारी देखील सुरु केली आहे. शहर तसेच ग्रामीण भागात मोरे दौरे करत फिरत आहेत. तसेच मोरे नेहमीच आपल्या कामाच्या पद्धतीने प्रकाशझोतात असतात. सोशल मीडियावर त्यांना पसंत करणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे.