Pune Corporation Election 2026 | पुणे महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र, शपथपत्र आणि इतर कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर
PMC Election – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व इच्छुक उमेदवार देखील कामाला लागले आहेत. दरम्यान निवडणुकीला सामोरे जाताना बऱ्याच छोट्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. कारण नामनिर्देशन, शपथपत्र आणि इतर कागदपत्रे सादर करताना काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्याची प्रक्रिया काय आहे, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Pune Municipal Corporation – PMC Election)
1. नामनिर्देशनपत्र ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यात दाखल करावयाचे आहे.
2. उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी सर्वसाधारणपणे खालील कागदपत्रे सादर करावी लागतात :-
(अ) नामनिर्देशनपत्र
(ब) मत्ता व दायित्व तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतचे शपथपत्र
(क) मतदार अन्य प्रभागातील असल्यास मतदार यादीचा उतारा
(ड) शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र
(इ) पक्षातर्फे निवडणूक लढवीत असल्यास त्याबाबत “जोडपत्र-१” व “जोडपत्र-२”
(ई) जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र (जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी
समितीकडे अर्ज सादर केल्याची पावती व हमीपत्र)
(उ) इतर आवश्यक केलेली कागदपत्रे (ना देय प्रमाणपत्र इ.)
3. हेल्प डेस्क व प्रशिक्षण –
सर्व उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र इ. भरण्यात अडचण येऊ नये म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांद्वारे एक किंवा आवश्यकतेप्रमाणे त्यापेक्षा जास्त मदत कक्ष (Help Desk) स्थापना करण्यात येईल.
4. स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही :
उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाचे शपथपत्र विहित करण्यात आलेल्या नमुन्यात भरुन स्वतःची स्वाक्षरी करुन व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्यासमोर दृढकथन करुन ते निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचे आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या क्र. रानिआ/मनपा-२०१४/प्र.क्र.२२/का-०५, दि.८/१/२०१५ च्या आदेशानुसार अशी शपथपत्रे स्टॅम्प पेपरवर सादर करण्याची आवश्यकता नाही.
5. जातवैधता प्रमाणपत्र:
राखीव प्रभागातून सदस्य पदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तथापि, जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांनी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पोचपावती नामनिर्देशनपत्रांसोबत सादर करण्याची त्यांना मुभा देण्यात आली आहे. अशा उमेदवारांनी निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याबाबत अधिनियमात तरतूद आहे. या संदर्भात नामनिर्देशन पत्रासोबत विहित नमुन्यात हमीपत्र देणे बंधनकारक आहे.
6. पक्षाच्या उमेदवाराने द्यायवाचे जोडपत्र-
महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणी, विनियमन आणि नियाचित्रण वाटप) आदेश, २०२५, दि. ०५ मे, २०२५ रोजी प्रसिध्द केले आहेत. त्या नुसार आवश्यक ती प्रमाणपत्रे व पक्षातर्फे निवडणूक लढवीत असल्याबाबत पक्षाचा अध्यक्ष, सचिव किंवा सूचना पाठविण्यास प्राधिकृत केलेल्या पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्याने शाईचे अथया बॉलपेनने स्वाक्षरी केलेले “जोडपत्र-२” उमेदवाराने विहित मुदतीत सादर करावे, राजकीय पक्षांनी, विहित नमुन्यातील पक्षाचा अध्यक्ष सचिव यांनी बॉलपेनने स्वाक्षरी केलेले, “जोडपत्र-१ विहित मुदतीत संबंधित महानगरपालिका आयुक्त / निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
7. शौचालयाच्या वापराबाबतचे प्रमाणपत्र –
महानगरपालिका निवडणुकांकरीता निवडणूक लढविणारा उमेदवार शौचालयाचा नियमित वापर करीत आहेत इ. बाबतचे महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांचे किंवा अशा व्यक्तीचे स्वयंप्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
8. उमेदवारी मागे घेणे-
उमेदवाराला त्याची उमेदवारी मागे घ्यावयाची असल्यास त्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकरीता असलेल्या माहिती पुस्तिकेतील विहित नमुन्यात घ्यावयाचा अर्ज विहित पध्दतीने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा आहे.
9. उमेदवारी मागे घेण्याचे अर्ज संगणकाद्वारे भरावयाचे नाहीत अथवा ई – मेलव्दारे देता येणार नाहीत.
10. नामनिर्देशनपत्रासोबत जोडावयाच्या शपथपत्रातील कोणत्याही रकान्यात माहिती न भरल्यास – रकाने रिकामे सोडल्यास अर्ज अपात्र ठरू शकतो.
11. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा रुपये पंधरा लक्ष हे निश्चित करण्यात आलेली आहे.
12. उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्रासोबत दाखल झालेली शपथपत्रांची प्रत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सूचना फलकावर तसेच महानगरपालिकेच्या निवडणूक विषयक संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे. उमेदवाराने सादर केलेल्या शपथपत्रातील माहिती चुकीची आहे असे प्रतिस्पर्धी उमेदवारास वाटत असल्यास त्याबाबत शपथ पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करता येते.
13. आयोगाच्या आदेशाप्रमाणे व्हिडिओग्राफी सर्व बॅलन्स पथक भरारी पथके आणि तक्रार निवारण कक्ष या सह आचारसंहिता आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना करण्यात येतील.
14. प्रसार माध्यमांचा गैरवापर टाळणे तसेच निवडणुकीसाठी करण्यात येणार्या जाहिरातींचे प्रमाण इत्यादी बाबत दिनांक ०९/१०/२०२५ अन्वये स्थापन केलेल्या समितीची मान्यता घेणे उमेदवारांना बंधनकारक आहे.
15. मतदान समाप्तीच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार बंद करणे आवश्यक राहील.
16. दैनंदिन निवडणूक खर्चाचा हिशोब उमेदवाराने दर दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
17. निवडणुकीच्या निकालानंतर तीस दिवसांच्या आत एकूण खर्चाचा हिशोब व त्यासोबत निवडणुकीवर झालेल्या सर्व खर्चाचा तपशील देण्यात आलेला असून लपवण्यात आलेला नसल्याबाबतची शपथपत्र देणे बंधनकारक आहे. आवश्यकता भासल्यास खर्चाची सत्यता तपासण्याची देखील अधिकार आहेत.

COMMENTS