केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात पुणे काँग्रेसची निदर्शने
पुणे: केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारची तिरूपती येथील नाभिक समाजाच्या कामाशी तुलना करून समाजाचा अपमान केल्याप्रकरणी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे स्टेशन येथे केंद्रीय रेल्व राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.
यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘आम्ही महात्मा गांधींना आदर्श मानतो. त्यामुळे आमची प्रत्येक आंदोलन ही अहिंसक असतात आणि ती कायमच अहिंसक राहतील. परंतु रेल्वे पोलिसांना पुढें करून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे जरी आमचे आंदोलन दडपून टाकू पाहत असले तरीही आमचा आवाज मात्र ते दाबू शकत नाहीत. रावसाहेब दानवे यांच्या डोक्यात सत्तेची आणि मंत्रिपदाची हवा गेली आहे त्यामुळे ते कधी शेतकऱ्यांचा अपमान करतात तर कधी बहुजन समाजातील बारा बलुतेदारांचा अपमान करतात. शिवा काशीद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली होती. ‘‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’’ अशी म्हण ज्या समाजातील मावळ्याने केलेल्या कार्यामुळे रूढ झाली. अशा समाजाबाबत त्यांच्या कामावरुन आक्षेपार्ह विधान करणे ही मनुवादी वृत्ती आहे. हे संघाचे संस्कार रावसाहेब दानवे आणि भाजपच्या प्रत्येकच नेत्यात नेहमी दिसतात. मग ते कधी शिवरायांचा अवमान करतील तर कधी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान करतील. कधी शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतील तर कधी नाभिक समाजाबाबत आक्षेपार्ह विधान करतील. या सर्व वृत्तीचा पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही निषेध करतो.’’
यानंतर माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, नगरसेवक अरविंद शिंदे, नाभिक समाजाचे सोमनाथ काशिद आदींची भाषणे झाली.
यावेळी नगरसेवक रविंद्र धंगेकर, लता राजगुरू, दत्ता बहिरट, महिला अध्यक्षा पुजा आनंद, राजेंद्र शिरसाट, अरूण वाघमारे, शिलार रतनगिरी, प्रशांत सुरसे, सुनील दैठणकर, आबा जगताप, राजू शेख, वाल्मिक जगताप, राहुल तायडे, मीरा शिंदे, क्लेमेंट लाजरस, मुन्नाभाई शेख, बाबा नायडू, विशाल मलके, सचिन भोसले, बाबा सय्यद, बाळू कांबळे, शोभना पण्णीकर यांच्या सोबत न्हावी समाजाचे अनेक लोक तसेच काँग्रेसचे सर्व मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
COMMENTS