Pune Bal Pustak Jatra | पुणे बाल पुस्तक जत्रेला गुरुवारपासून प्रारंभ

HomeBooks

Pune Bal Pustak Jatra | पुणे बाल पुस्तक जत्रेला गुरुवारपासून प्रारंभ

Ganesh Kumar Mule May 19, 2025 6:18 PM

PMC Pune Employees Promotion | ‘अनुभव’ आणि ‘सेवा’ या शब्दाच्या गल्लतीमुळे पुणे महापालिकेचे बहुसंख्य कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित!
Supriya Sule | यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी आता १२ मे पर्यंत अर्ज करता येतील | खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती
Draft Voter List | प्रारूप मतदार याद्यामुळे संभ्रमाचे वातावरण!  | इच्छुकांचे टेन्शन वाढले 

Pune Bal Pustak Jatra | पुणे बाल पुस्तक जत्रेला गुरुवारपासून प्रारंभ

| केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता उद्घाटन

 

Pune Bal Pustak Jatra – (The Karbhari News Service) – मुलांना वाचनाची गोडी लावण्यासोबत इतिहास, कला, साहित्य व संस्कृतीची माहिती सांगणाऱ्या; तसेच विविध प्रयोगशील उपक्रमांतून मुलांचे मनोरंजन करत कल्पकता-कुतूहल-उत्सुकतेचा आनंद देणाऱ्या भव्य पुणे बाल पुस्तक जत्रेला येत्या गुरुवारपासून (२२ मे) गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे सुरुवात होणार आहे. (Pune News)

केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे आणि पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता पुणे बाल पुस्तक जत्रेचे उद्घाटन होणार आहे. या प्रसंगी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकूर, खडकी शिक्षण संस्था आणि कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, लेखिका संगीता बर्वे, लेखक-चित्रकार-प्रकाशक ल. म. कडू आणि बाल साहित्यकार राजीव तांबे हे उपस्थित राहणार आहेत, असे राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.

राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका आणि संवाद पुणे यांच्या वतीने पुणे बाल पुस्तक जत्रा या विनामूल्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिजात दर्जा लाभलेल्या मराठी भाषेत समृद्ध बाल साहित्य आहे. या पुस्तकांची माहिती मुलांना देऊन भविष्यातील चांगले वाचक घडविण्याचा प्रयत्न या जत्रेतून केला जाणार आहे. मुलांचे लेखन-वाचन-आकलन कौशल्य वाढविणारी ही प्रक्रिया हसत-खेळत करण्यावर जत्रेचा भर आहे. त्यासाठी बाळगोपाळांसमवेत पालक आणि शिक्षकांसाठीही नावीन्यपूर्ण कार्यक्रम, उपक्रम, परिसंवाद व कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून, खाऊगल्लीत मुलांना चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे, असेही राजेश पांडे यांनी सांगितले.

*वाचा, खेळा, करा धम्माल*

‘पुणे बाल पुस्तक जत्रेत भव्य पुस्तक प्रदर्शनांसोबत बाल साहित्य लेखन स्पर्धा, कविसंमेलन, जादूचे व बाहुल्यांचे खेळ, पथनाट्य, विमान विज्ञान कार्यशाळा अशा विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची रेलचेल आहे. अधिकाधिक पुणेकरांनी आपल्या मुलांसमवेत पुणे बाल पुस्तक जत्रेला भेट देऊन साहित्य संस्कृतीच्या अभिनव बालमेळ्याचा अनुभव घ्यावा,’ असे आवाहन राजेश पांडे यांनी केले आहे.

*बालपणीचे खेळ विनामूल्य खेळण्याची संधी*

‘आपले अंगण’ या उपक्रमात मुलामुलींना विटी दांडू, चाक फिरवणे, भोवरा फिरवणे, भातुकली असे १६ प्रकारचे जुने खेळ विनामूल्य खेळण्याची संधी मिळणार आहे. या खेळांशी संबंधित साहित्य तेथे विक्रीसाठी उपलब्ध असेल. या उपक्रमाची झलक जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात आज (मंगळवार, २० मे) दुपारी ४ वाजता बाल साहित्यकार राजीव तांबे, कवी संदीप खरे, अभिनेते प्रवीण तरडे, माजी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, मिलिंद भोई, अभिनेत्री पूर्वा शिंदे, तेजस्विनी लोणारी अशा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पाहता येणार आहे. हे सर्व मान्यवर अंगणातल्या खेळांचा अनुभव घेत ‘आम्ही खेळलो, तुम्ही या खेळायला’ या असा संदेश देणार आहेत. त्यानंतर हा उपक्रम २२ ते २५ मे या कालावधीत गणेश कला क्रीडा मंच येथे विनामूल्य अनुभवता येणार आहे. या निमित्ताने जुन्या खेळांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन केले जाणार आहे. रेवा पांडे यांनी हे पुस्तक संकलित केले आहे. त्यासाठी अनिल बेलकर यांनी सहकार्य केले आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन उद्या (बुधवारी २१ मे) होईल,’ अशी माहिती ‘संवाद पुणे’चे सुनील महाजन यांनी दिली.

0 Comments