Pune Airport Terminal | विमानतळ टर्मिनलचे उदघाटन मोदींसाठी थांबले हा प्रकार संतापजनक | माजी आमदार मोहन जोशी
| १जानेवारीला उदघाटन व्हावे, अन्यथा तीव्र आंदोलन
Pune Airport Terminal | पुणे – प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल (Pune Airport New Terminal) कार्यान्वित होणे गरजेचे आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची वेळ मिळत नसल्याने उदघाटनासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. हा प्रकार पुणेकरांसाठी संतापजनक आहे, १जानेवारीपूर्वी उदघाटन व्हावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेस पक्षाचे माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. (Pune Airport New Terminal)
विमान प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने पुणे विमानतळावर अनेक गैरसोयी वाढू लागल्या. विमानाचे लॅन्डिंग करण्यातही अडथळे येत आहेत. विमान प्रवाशांची संख्या वर्षाकाठी ७०लाख होती, ती ९०लाखांपर्यंत जावून पोहोचलेली आहे. ती लवकरच १कोटीचा आकडा ओलांडेल, अशी शक्यता आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे गैरसोयी वाढल्या. विमानतळावरची शांतता संपून, गजबजाट झाला. विमानांच्या लॅन्डिंगला अडथळे येऊ लागले. यावर उपाययोजना म्हणून ५२५ कोटी रुपये खर्चून नवे टर्मिनल उभारण्यात आले. ऑगस्ट २०२३ पूर्वीच नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले, चाचण्याही झाल्या. टर्मिनल ताबडतोब कार्यान्वित व्हावे यासाठी विमान प्रवाशांनी सोशल मिडियाद्वारे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर पोर्ट ॲथॉरिटीचे लक्ष वेधले. त्याला दाद देण्यात आली नाही, असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे. (Pune News)
नव्या टर्मिनलचे उदघाटन २०२३ सालातील सप्टेंबर महिन्यात होईल, असे हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी जाहीर केले. सप्टेंबर महिना उलटला, मग ऑक्टोबर महिन्याचा वायदा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन व्हावे, यासाठी त्यांच्या कार्यालयाला पत्रही लिहीले. मात्र, पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात गुंतून पडलेल्या मोदींनी उदघाटनासाठी वेळ दिला नाही. नवे टर्मिनल चालू व्हावे यासाठी प्रवासी आतुर झाले आहेत. विमानतळाची प्रवासी क्षमता वाढणार आहे, विमानांची संख्या वाढणार आहे. मात्र, पंतप्रधान मोदी यांना कामाचे श्रेय घेऊन मिरवायचे आहे. याकरिता भाजपच्या नेत्यांकडून वेळकाढूपणा चालू आहेत. हे डावपेच निंदनीय आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.