Prathmesh Abnave | सणासुदीत महागाईचा भडका उडाल्याने लाडकी बहीण त्रस्त : प्रथमेश आबनावे
Inflation in Diwali – (The Karbhari News Service) – दिवाळी (Diwali) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल, डाळी व अन्य किराणा मालाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण (Ladki Bahin) योजनेमुळे खुश झालेल्या महिला वर्ग भडकला असून, आम्ही सणवार साजरे करायचे नाही?, असा प्रश्न लाडक्या भावांना विचारताना पाहायला मिळत आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे (Prathmesh Abnave Congress) यांनी केली. एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे हेच महायुती सरकारचे धोरण असल्याचेही त्यांनी सांगितले. (Pune News)
प्रथमेश आबनावे म्हणाले, “गणेशोत्सव, नवरात्र आणि आता दिवाळीचा सण तोंडावर आहे. खाद्यतेलाने दीडशे रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, डाळी, साखर, गूळ, कांदा-बटाट्याने भाव खाल्लेला आहे. सर्वसामान्यांना परवडणार नाही अशा स्वरूपाचे हे भाव गेल्या चार-पाच महिन्यात वाढले आहेत. महागाईचा आगडोंब उसळलेला असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मात्र गुलाबी जॅकेट घालून मोठमोठे कार्यक्रम घेऊन, प्रसिद्धीचा मारा करून लाडकी बहीण खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. लाडकी बहीण योजनेत अवघे १५०० रुपये दिले जात आहेत. मात्र, त्या बदल्यात महागाईने लुटण्याचे काम सुरु आहे. या वाढलेल्या महागाईला जबाबदार कोण? हा सवाल सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.”
“महागाई नियंत्रणात आणण्यासाठी काम करण्याऐवजी हजार-पंधराशे रुपयांचे अमिश दाखवून त्याच्या प्रसिद्धीवर कोट्यवधीची उधळपट्टी सध्या राज्यात सुरु आहे. योजनेचे श्रेय घेण्यासाठी तिन्ही नेत्यांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागली आहे. या सर्वात सामान्य जनता होरपळून निघत असून, त्यांना दिलासा कधी मिळणार? हा प्रश्न आहे. घरात दोनवेळच्या जेवणाचे नियोजन कसे करायचे अशी भ्रांत अनेक कुटुंबाना आहे. त्यामुळे सरकारने अनावश्यक चमकोगिरी बंद करून महागाई नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल,” असा इशारा प्रथमेश आबनावे यांनी दिला.
COMMENTS