शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह लिखाणाबद्दल प्रशांत जगताप यांच्याकडून चितळे, भावे, भामरे यांच्यावर गुन्हा दाखल
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे,निखिल भामरे व ॲड.नितीन भावे यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५००/ ५०१/१५३अ/५०५ २९५अ या कलमान्वये केतकी चितळेसह ही मुळ पोस्ट लिहील्याचा आरोप असलेल्या वकील नितीन भावे आणि निखील भामरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रसंगी गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रशांत जगताप म्हणाले की, ” शरद पवारसाहेबांनी महाराष्ट्राच्या राजकीय,सामाजिक ,कृषी ,सहकार, शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. देशाच्या संरक्षण ,कृषी खात्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. देशाच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या विरोधात कुठल्यातरी केतकी चितळे नावाच्या अभिनेत्रीने अश्या प्रकारची टिका करावी ही बाब खरोखर अशोभनीय आहे. मुळात ही केवळ एक व्यक्ती , एक अभिनेत्री नसून एक विकृती आहे. गेल्या काही दिवसांमध्ये केतकी चितळेवर अश्या वादग्रस्त पोस्टमुळे वारंवार गुन्हे दाखल झाले आहेत.
या सर्व गोष्टी घडण्यास या व्यक्तींसोबतच यांची विचारसरणी कारणीभूत आहे. तर यांच्या विचारसरणी मागे काही राजकीय पक्षांच्या मातृसंघटना असून या संघटनांनी नेहमीच मनुवादी पिढी घडवत पुरोगामी नेत्यांबद्दल, बहुजन समाजाबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, या द्वेषातूनच हे सर्व प्रकार घडत आहेत. या मंडळी आपल्या पुढच्या पिढीला जर अशी शिकवण देणार असतील तर आम्ही सुध्दा येणाऱ्या काळात या प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यास समर्थ आहोत” , असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी देऊ इच्छितो. असे ही जगताप म्हणाले.
COMMENTS