विमानतळावरून राजकारण तापले
: भाजपमध्ये दुफळी असल्याचा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा आरोप
पुणे : विमानतळावरून शहर आणि जिल्ह्याचे राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. खासदार गिरीश बापट यांनी विस्तारीकरणाबाबत घेतलेल्या भूमिकेवरून हा वाद निर्माण झाला आहे. गिरीश बापट यांनी लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण करावे असे म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यानी दिल्लीवारी करत विस्तारीकरण आणि नवीन विमानतळ याबाबत भूमिका घेतली आहे. यामुळे विरोधकांना कोलीत मिळाले. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने या विषयावरून भाजपला घेरलेले पाहायला मिळाले.
पुणे आणि परिसरातील विमान प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज पाच लाख चौरस फुटांचे टर्मिनल उभे राहणार : खासदार बापट
पुण्यातून विमान प्रवासी वाहतुकीत सातत्याने होणारी वाढ आणि सध्याच्या इमारतीतील गर्दी कमी करण्यासाठी पाच लाख चौरस फुटापेक्षा अधिक क्षेत्रफळ आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले इंटिग्रेटेड टर्मिनल बांधण्यात येणार आहे. ते यावर्षी वापरासाठी खुले होईल असा विश्वास खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.
खासदार बापट यांची नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याशी विमानतळ विस्तारीकरणाबाबत नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीत त्यांनी विमानतळ विस्तारीकरणासाठी कार्गो साठी आवश्यक असलेली १३ एकर जागा १ रुपया नाममात्र दराने उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. तसेच विमानतळ परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी a संरक्षक विभागाची २३६० चौरस मीटर जागा देण्याचे देखील मान्य केले.
विमानतळ विस्तारीकरण, वाहतूक, बहुमजली पार्किंग आदी विकासकामे जलद गतीने पूर्ण करून प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होतील याबाबत सूचना केल्या. तसेच विमानतळ धावपट्टीचे विस्तारीकरणासाठी वायुदलाची १३६ एकर जागा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
अत्याधुनिक नवीन इंटीग्रेटेड टर्मिनल हे पूर्णत: वातानुकूलित असेल. प्रतिवर्षी 1 कोटी 90 लाख प्रवाशांना सामावण्याची त्याची क्षमता असेल. यात गर्दीच्यावेळी 2 हजार 300 प्रवाशांना (1 हजार 700, देशांतर्गत आणि 600 नग आंतरराष्ट्रीय सेवा देता येईल. या इमारतीत प्रवाशांना विमानापर्यंत पोचविणारे 5 नवीन मार्ग (पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज), 8 स्वयंचलित जिने (एस्केलेटर), 15 लिफ्ट, 34 चेक-इन काउंटर, प्रवासी सामान वहन यंत्रणा, आगमन क्षेत्रात पाच कन्व्हेयर बेल्टसह आदी अद्ययावत सुविधा इमारतीत असतील.
टर्मिनलचे बांधकाम हे 2018 पासून सुरू करण्यात आले आहे. त्यातील 61 टक्के काम पूर्ण झाले असून, ऑगस्ट 2022 पर्यंत ते पूर्ण होईल. विमानतळावर पार्किगसाठी जागेची कायम समस्या राहिली आहे. नव्या इमारतीमुळे त्यावर कायमस्वरुपी तोडगा निघेल. त्यासाठी 120 कोटी रुपये खर्च करून चार मजली आणि दोन मजले बेसमेंट असलेली इमारतही बांधण्यात येत आहे. त्यात 1024 वाहनांचे एकावेळी पार्किंग करता येईल. नव्या इमारतींमध्ये प्रवाशांचे मनोरंजन, व्यावसायिक वापरासाठी देखील 15 हजार चौरस फूट जागा देण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटातील प्रवाशांना अनुकूल असे हे नवे टर्मिनल असेल.
गिरीश बापट यांनी सांगितले, की सध्याच्या विमानतळावरील टर्मिनल केवळ 22 हजार चौरस मीटर आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांची आणि विमान कंपन्यांची मोठी गैरसोय होते. या टर्मिनलमध्ये दरवर्षी 80 लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी सुसज्ज टर्मिनलची गरज होती. ती आता पूर्ण होईल.
पुणे आणि परिसराची वाढती गरज लक्षात घेता विविध ठिकाणी विमानतळासाठी जागा पाहाणी सुरू आहे. पुणे शहरात एकापेक्षा अधिक विमानतळ निर्माण होण्यास आमचा विरोध नाही. परंतु हे होत असताना लोहगाव विमानतळाचे मध्यवर्ती स्थान लक्षात घेता ते प्रवाशांसाठी अधिक सोईचे आहे त्यामुळे लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. असे गिरीश बापट (खासदार) म्हणाले.
: पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आग्रही भूमिका. : प्रशांत जगताप
राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रशांत जगताप म्हणाले, पार्टीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अथक प्रयत्नातून पुणे जिल्हा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न मार्गी लावला असून या गोष्टी अंतिम टप्प्यात आहे, असे असताना भारतीय जनता पार्टी निव्वळ या विषयात राजकारण करण्याचे काम करत असून पुणे शहरात दुफळी झालेल्या भाजपाचे माजी महापौर दिल्लीत जाऊन विमानतळाचे निवेदन देत आहेत. तर व्यथित झालेले खासदार
पुणे विमानतळावर जाऊन निष्फळ वक्तव्य करत आहेत.भाजपच्या राजकारणामुळे यापूर्वी देखील चाकण येथे होणारे विमानतळ रद्द झाले असून आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे होऊ देणार नाही. जिल्ह्यात कोठेही आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे परंतु ते लवकरात लवकर व्हावे, हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका.
: भाजपतील अंतर्गत लाथाळ्यांमुळे पुण्याचा विमानतळ धोक्यात : माजी आमदार मोहन जोशी
भारतीय जनता पक्षातील अंतर्गत लाथाळ्यांमुळे पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळण्याची शक्यताच धोक्यात आली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
पुण्यातील लोहगाव विमानतळाचे विस्तारिकरण व्हावे आणि पुण्यात आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावा अशा मागण्या उद्योजक आणि ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या आहेत. देशाच्या संसदेत नुकत्याच झालेल्या चर्चेतही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही मागणी जोरदारपणे मांडली. काँग्रेस पक्षानेही या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. पुण्याला स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळावा यासाठी जनमत तयार होत असतानाच भारतीय जनता पक्षाने मात्र अंतर्गत लाथाळ्यांचे दर्शन घडविले आहे. भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी लोहगाव विमानतळाला आज भेट दिली आणि विस्तारिकरणाच्या योजनांवर भाष्य केले. त्याचवेळी आपल्याच पक्षाच्या खासदाराला डावलून भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खासदार प्रकाश जावडेकर, राज्यसभेचे सभासद विनय सहस्रबुद्धे यांना घेऊन दिल्लीमध्ये संरक्षणमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर पुणे विमानतळ विस्तारीकरण आणि पुरंदर येथे नव्याने आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारणे अशा दोन विषयांवर चर्चा झाल्याचे माजी महापौरांनी सांगितले. विमानतळ या महत्त्वाच्या विषयावर भाजपचे खासदार आणि पदाधिकारी यांच्या वेगवेगळ्या बैठका होतात. सत्ताधारी पक्षातल्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे विमानतळाचा प्रस्तावच धोक्यात येतो का? अशी स्थिती निर्माण झाल्याचे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांनी मेट्रो मार्गाला विरोध केला होता. त्यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट होते. त्या दोघांमधील वादांमुळे मेट्रो प्रकल्पाचे काम दोन वर्षे लांबले आणि त्याचा खर्चही वाढला. तोच प्रकार विमानतळाच्या बाबतीत होणार असे दिसू लागले आहे, असे माजी आमदार मोहन जोशी यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
COMMENTS