PMC Property Tax Bills | मिळकत कराच्या बिलाबाबत आणि ४० टक्के सवलती बाबत प्रशासनाने दिली ही माहिती
Pune Property Tax Bill – (The Karbhari News Service) – मिळकतकरातील ४०% सवलतीवरुन मध्यंतरी खूप मोठा गदारोळ झाला होता. आपल्याला ही सवलत मिळते की नाही हेच मुळी मालमत्ता कर बिल वाचून कळत नाही, त्यामुळे हा गोंधळ आणखी वाढला. खरं तर ही करदात्या नागरीकांची मूलभूत गरज आहे, पण दुर्दैवाने नागरीकांनाच काय पण महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा नुसते बिल पाहून सदरहू बिलात ४०% सवलत दिली गेली आहे की नाही हे समजत नाही , त्यासाठी त्यांनाही मनपा संगणक प्रणालीमध्ये शोधावे लागते. या पार्श्वभूमीवर यंदापासून तरी या मिळकतकर बिलावर त्या बिलात ४०% सवलत दिली गेली आहे की नाही हे ठळकपणे छापावे. अशी मागणी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी केली होती. त्यावर आता महापालिका जागी झाली आहे. ४० टक्के सवलती बाबत नागरिकांना माहिती होण्यासाठी प्रशासनाने प्रसार माध्यमाकडे याची प्रसिद्धी दिली आहे. (Pune Municipal Corporation Property Tax Department)
०१.०४.२०१९ पूर्वी मिळकतीची आकारणी झाली असल्यास :-
दि. ०१.०४.२०१९ पूर्वी स्व वापर करत असलेल्या निवासी मिळकतींना करपात्र रकमेत ४०% सवलत देण्यात येत होती त्यामुळे दि. ०१.०४.२०१९ पूर्वी आकारणी झालेल्या निवासी मिळकतींना ४०% सवलत देण्यात येत आहे असे गृहीत धरण्यात आले आहे.
०१.०४.२०१९ नंतर किंवा जी. आय. एस. सर्व्हे अंतर्गत दि. ०१.०४.२०१८ पासून सवलत काढून घेतली असल्यास :-
ज्या निवासी मिळकतींची आकारणी दि. ०१.०४.२०१९ नंतर झाली आहे किंवा ज्यांची सवलत जी.आय.एस. सर्व्हे अंतर्गत काढून घेण्यात आली होती त्यांना PT – ३ अर्ज भरणेकरिता आवाहन करण्यात आले होते तसेच मिळकतकर विभागाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार मिळकतधारकांकडून प्राप्त झालेले अर्ज व मिळकतकर विभागाकडून झालेल्या सर्वेक्षणानुसार मंजूर झालेल्या मिळकतींना ४०% सवलत देण्यात आली आहे व सन २०२५-२६ च्या देयकात असा उल्लेख करण्यात आला आहे. जे मिळकतधारक स्वतः राहत असून देखील ज्यांनी PT- ३ अर्ज जमा केलेले नाहीत किंवा ज्यांनी अर्ज भरून देखील कागदपत्रे अपूर्ण असल्याने किंवा इतर कारणांनी ज्यांचे फॉर्म अपात्र ठरले आहेत त्यांनी त्याबाबतची पूर्तता करून नजीकच्या क्षेत्रिय /संपर्क कार्यालयातून करून घेणे.
सन २०२५-२६ च्या देयकांचे घरोघरी वितरण भारतीय पोस्ट मार्फत करण्यात येत आहेत. तसेच मिळकतधारकांना SMS व ई-मेलद्वारे देयके पाठवण्यात आली आहेत, ऑनलाईन देयके पाहणेकरिता किंवा भरणेकरिता propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
मिळकतधारकांच्या सोयीकरिता मुख्य कार्यालय, पुणे महानगरपालिका येथे तक्रार निवारण कक्ष बनवण्यात आला आहे. तसेच देयकाबाबत काही तक्रार किंवा अडचण असल्यास तक्रार निवारण दूरध्वनी क्र. ०२०-२५५०११५९ या क्रमांकावर संपर्क करावा.
जे मिळकतधारक ३० जून २०२५ पर्यंत एक रकमी मिळकतकर भरतील त्या सर्व मिळकतींना ५ किंवा १०% सवलत मिळेल त्यासाठी मुदतीत आपला मिळकतकर भरावा असे आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS