PMC Election 2025 | आरक्षण सोडत कार्यक्रमाचे महापालिका प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन | अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नेमून दिली कामे
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये आता चांगलीच गती आली आहे. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता आरक्षण सोडत कार्यक्रमाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान या कार्यक्रमाचे महापालिका प्रशासनाकडून कसून नियोजन सुरू आहे. याबाबत महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कामे नेमून देण्यात आली आहेत. (Pune Municipal Corporation Election 2025)
अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर मंगळवार रोजी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे काढण्यात येणार आहे. त्यासाठीचे नियोजन प्रशासनाने सुरू केले आहे. सोडतीच्या अनुषंगाने मार्गदर्शक तत्वे, सूचना, आदेश आणि नियम यांची पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षण बाबत सुस्पष्ट माहिती देण्याचे काम उपायुक्त प्रसाद काटकर यांच्याकडे देण्यात आले आहे. (Pune PMC Election 2025)
सोडतीच्या अनुषंगाने नागरिकांना स्टेजवर २ आणि बाहेरील बाजूस २ एलइडी स्क्रीन ची व्यवस्था करण्यात येणार आहे. सोडतीतील आरक्षित जागा नागरिकांना प्रोजेक्ट द्वारे स्क्रीन वर दिसतील. सोडतीसाठी महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील ७ वी मधील ५ मुले आणि ५ मुली यांना आणण्यात येणार आहे. त्यांच्या हस्ते चिठ्या काढण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमासाठी महापालिकेतील सर्वच विभागांना कामे नेमून देण्यात आली आहेत. यात आरोग्य, सुरक्षा, अग्निशमन, भवन रचना, मोटार वाहन, अतिक्रमण, विद्युत, सांस्कृतिक सुरक्षा, शिक्षण, सामान्य प्रशासन, आयटी विभाग अशा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामे देण्यात आली आहेत.

COMMENTS