बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे ‘जोडो मारो’ आंदोलन
पुणे : बंडातात्या कराडकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केले. बंडातात्या कराडकर यांच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील संत ज्ञानेश्वर पादुका चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बंडातात्या कराडकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व करत असताना प्रशांत जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. “संतांची भूमी” म्हणून संपूर्ण जगात महाराष्ट्राची ओळख आहे. वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे. संपूर्ण जगाला सद्भावनेचा, मानवतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायात बंडातात्या कराडकर यांच्यासारख्या वाईट प्रवृत्तींनी घुसखोरी केली आहे. वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलिन करण्याचा हा सुनियोजित कट असू शकतो. ही बाब वेळीच ओळखून अशा प्रवृत्तींना बाजूला करावे असे आवाहन प्रशांत जगताप यांनी केले. बोलणारी व्यक्ती आपल्याला दिसत असली तरी त्या व्यक्तीचा बोलविता धनी कोण आहे याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे असेही त्यांनी नमूद केले.
या आंदोलनास पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून बंड्यातात्या कराडकर यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.या आंदोलनप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे,राजलक्ष्मी भोसले,प्रदीप देशमुख, मृणालिनी वाणी, ॲड.रुपाली पाटील, महेश हांडे, किशोर कांबळे, गणेश नलावडे, अजिंक्य पालकर, मनोज पाचपुते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS