आधी नरेंद्र मोदींचा राजीनामा मागावा : प्रशांत जगताप
: नवाब मलिकांच्या समर्थनार्थ पुणे राष्ट्रवादीचे आंदोलन
पुणे : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत सुरू केलेल्या खोट्या चौकशी व दडपशाहीच्या विरोधात तसेच महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीद्वारे सूड बुद्धीने केलेल्या कारवाईच्या विरोधात भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बालगंधर्व चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्राला विनयशील राजकारणाचा संमृद्ध वारसा दिला. आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासह सर्व नेत्यांनी तो वारसा जपला आणि वाढवला. भारतीय जनता पार्टीने मात्र या परंपरेला हरताळ फासत सुडाचे राजकारण सुरु केले. भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर पडू लागताच भाजपच्या वतीने केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग सुरु झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी याचा तीर्व आंदोलन करत भारतीय जनता पार्टीचा निषेध केला. आमदार चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा मागितला यावर प्रतिक्रिया देताना “नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील ६३% मंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, म्हणून राजीनामा मागायचा असेल तर आधी नरेंद्र मोदींचा राजीनामा मागावा” असे आवाहन प्रशांत जगताप यांनी केले.
या आंदोलनात शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दिपालीताई धुमाळ,प्रदीप देशमुख, मृणालिनीताई वाणी,रुपाली ठोंबरे पाटील, किशोर कांबळे, सुषमा सातपुते, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS